प्रवीण तरडे दिग्दर्शित आगामी ‘मुळशी पॅटर्न’ हा मराठी चित्रपट या महिन्याअखेरिस प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. जमिनीला सोन्याचा भाव मिळत आहे, त्यामुळे शेती करून तोट्यात जाण्यापेक्षा जमीन विकून बक्कळ पैसा मिळवण्याचा हव्यास बाळगलेल्या तरुण पिढीवर ‘मुळशी पॅटर्न’ची कथा आधारलेली आहे.

पैशांचा हव्यास, गुन्हेगारी अशा अनेक गोष्टींवर आधारलेला ‘मुळशी पॅटर्न’ची गोष्ट फक्त एका तालुक्याची गोष्ट नाही तर ती अख्ख्या देशाची गोष्ट आहे. या चित्रपटासाठी संवाद, कथा, पटकथा देखील प्रविण तरडे यांनीच लिहिली आहे. अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि किरण दगडे पाटील प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. येत्या २३ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत मानाची विविध पारितोषिक मिळललेल्या अनेक कलाकारांना मुळशी पॅटर्न चित्रपटात संधी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मुळशी पॅटर्न हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. या चित्रपटातील प्रसिद्ध ‘आरारारा’ गाण्यात अमोल शिंदे आणि विठ्ठल शेलार या दोन गुन्हेगारांचा समावेश करण्यात आल्यानं वाद निर्माण झाला होता. मात्र त्यांना गाण्यात घेण्यामागे काहीतरी कारण आहे हे चित्रपट पाहिल्यानंतर लक्षात येईल असं सांगत प्रविण तरडेंनी एकप्रकारे याचं समर्थन केलं होतं.