किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची भागीदारी विकून अमेरिकेत स्थायिक होणार ही केवळ अफवा असून यावर विश्वास ठेवू नये असे माहिती किंग्ज इलेव्हन पंजाबची मालकीण व अभिनेत्री प्रीती झिंटाने आपल्या ट्विटर अकाऊंट वरून दिली आहे.
त्याचबरोबर ट्‌विटरवरून तिने पाठिंबा दिल्याबद्दल आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाबची भागीदारी विकणार असल्याची केवळ अफवा आहे. शिवाय, मी अमेरिकेत स्थायिक होणार असल्याचीही वार्ता खोटी आहे. असेही ती म्हणाली.
उद्योगपती आणि एकेकाळचा प्रियकर नेस वाडिया यांच्याविरोधात दाखल केलेल्या विनयभंगाच्या तक्रारीवरून अभिनेत्री प्रीती झिंटा चर्चेत आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी घटनेच्या वेळी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या दोघांचे जबाब नोंदविले आहेत. स्टेडियममधील सीसी टीव्ही कॅमेराचे फुटेज तपासल्यानंतर पोलीस प्रीतीचा नव्याने जबाब घेणार असल्याचे समजते.
तसेच या प्रकरणात सबळ पुरावे मिळविण्यासाठी प्रीती आणि नेस वाडिया यांनी एकमेकांना पाठविलेले ई-मेल्स, फोन कॉल्स देखील पोलीस तपासणार असल्याचे समजते.