राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘संजू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी त्याला अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. मात्र अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात बऱ्याच गोष्टी जाणीवपूर्वक दाखवण्यात आल्या नाहीत असंही मत अनेकांनी मांडलं आहे. मग ते त्याच्या पहिल्या दोन पत्नीविषयी असो किंवा मुंबई बॉम्बस्फोटानंतर त्याच्याजवळ आढळलेले सात हँडग्रेनेड्स असो, अशा काही गोष्टींचा उल्लेखही चित्रपटात का केला नाही असा सवाल अनेकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. यावर आता सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीसुद्धा काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ‘संजू’ चित्रपटाविषयी वक्तव्य केलं. १२ मार्च १९९३ आधी मुंबई बॉम्बस्फोटातील महत्त्वाचा आरोपी अबू सालेम एका टेम्पोमधून हँडग्रेनेड्स आणि रायफल घेऊन संजय दत्तच्या घरी आला होता. पाच एके ५६ रायफल्स आणि सात हँडग्रेनेड्स काही दिवस त्याच्या घरी ठेवण्यात आले होते हे या चित्रपटात का दाखवण्यात आले नाही, असा प्रश्न निकम यांनी उपस्थित केला.

‘वडील खासदार असल्याने संजयच्या घरी पोलीस संरक्षण होतंच. मग संरक्षणाच्या नावाखाली शस्त्र बाळगण्याचं कारण सांगत स्वत:चा बचाव आहे की त्यामागे दुसरा काही उद्देश होता, हे सुद्धा चित्रपटात दाखवणं आवश्यक होतं. बॉम्बस्फोटापूर्वी अशी शस्त्रं व हँडग्रेनेड्स घेऊन अबू सालेम आला होता, ही बाब संजयने पोलिसांना कळवली असती तर निरपराध लोकांचे प्राण वाचले असते. याबद्दल त्याला आता काय वाटतं, हेही चित्रपटात दाखवायला हवं होतं,’ असंही ते म्हणाले.

बायोपिक म्हटल्यावर वास्तव गोष्टींचा उल्लेख असणं अपेक्षित असतं, मात्र सहानुभूती मिळवण्यासाठी गुन्ह्यांवर पडदा टाकला जाऊ शकत नाही किंवा त्याचं खापर प्रसारमाध्यमांवर फोडून चालत नाही, असा टोला त्यांनी दिग्दर्शकांना लगावला आहे.

‘संजू’च्या यशासोबतच असे बरेचसे प्रश्न समोर येत आहेत. आता या प्रश्नांची उत्तरं राजकुमार हिरानी किंवा संजय दत्त कधी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.