बॉलिवूडचे नावाजलेले संगीतकार राहुल देव बर्मन म्हणजेच आर डी बर्मन यांचा आज वाढदिवस आहे. २७ जून १९३९ साली त्यांचा जन्म झाला होता. प्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन यांचे ते सुपूत्र होते. त्यामुळे त्यांना कुटुंबातूनच संगीताचा वारसा लाभला होता. प्रेमाने लोक त्यांना ‘पंचम दा’ म्हणत. १९६० ते १९९० या तीन दशकांमध्ये आरडी बर्मन यांनी त्यांच्या संगीताच्या जादूने रसिकांना मंत्रमुग्ध केलं. आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्यासरख्या गायकांना त्यांच्यामुळे यशाचं शिखर गाठता आलं. बर्मन यांनी जवळपास ३३१ सिनेमांना संगीत दिलंय.

‘पंचम दा’ यांची एक से बढकर एक रोमॅण्टिक गाणी आजही चाहत्यांच्या तोंडी आहेत. खासगी जीवनातही पंचम दा चांगलेच रोमॅण्टिंक होते. पहिल्या पत्नीलापासून विभक्त झाल्यानंतर बर्मन यांना आशा भोसले आवडू लागल्या होत्या. एवढचं नव्हे तर एके दिवशी त्यांनी आशा भोसलेंना लग्नासाठी प्रपोज केलं होतं. आशा भोसले या आरडी बर्मन यांच्याहून ६ वर्षांनी मोठ्या होत्या. मात्र तरिही बर्मन यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. पहिल्यांदा आशा भोसले यांनी बर्मन यांचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला. मात्र बर्मन यांनी हार मानली नाही.

लग्नात आल्या अडचणी

आरडी बर्मन हे आशा भोसले यांच्याशी लग्न करण्याच्या निर्णयावर ठाम होते. अखेर त्यांनी आशा भोसले यांना लग्नासाठी तयार केलंचं आणि दोघांनी लग्न गाठ बांधली. दोघांचं ही हे दुसरं लग्न होतं. असं असलं तरी लग्नाआधी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आशा भोसले बर्मन यांच्याहून ६ वर्षांनी मोठ्या होत्या. त्यांचं कुटुंब होतं. तर आर डी बर्मन यांच्या आईचा या लग्नाला विरोध होता.

दरम्यानच्या काळात आर डी बर्मन यांच्या वडिलांचं निधन झालं. वडिलांच्या जाण्याने बर्मन यांना मोठा धक्का बसला. तर त्यांच्या आई मीरा यांना तर पतिच्या निधनामुळे मानसिक समस्यांचा सामना करावा लागला. बर्मन यांच्या आईंची स्मरणशक्ती गेली. स्वत:च्या मुलालादेखील त्या ओळखत नव्हत्या. त्यांनी काही वेळ वाट पाहिली. मात्र आईच्या तब्येत काही सुधारणार नाही अशी चिव्ह दिसू लागल्याने त्यांनी अखेर आशा भोसले यांच्याशी लग्न केलं.