बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानचा ‘राधे’ चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्यानंतर आता निर्मात्यांना पायरेसीच्या अडचणीचा सामना करावा लागतोय. स्वतः ‘दबंग’ सलमान खानने यासंदर्भात पायरेसी करणार्‍यांना कडक इशारा दिला होता. जर ‘राधे’ चित्रपट पायरेसीने बघण्याचा प्रयत्न केला जर सायबरच्या सेलच्या अडचणीत अडकू शकता, अशी थेट चेतावनीच सलमान खानने दिली होती. आता यासंदर्भात तीन व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबूक युजर्सविरोधात पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. ‘राधे’ चित्रपटाची पायरेसी कॉपी सोशल मीडियावर लीक करण्याचा आरोप या तिघांवर करण्यात आलाय.

अद्याप या तिघांची ओळख समोर आलेली नाही. या गुन्ह्याअंतर्गत पोलिसांना तीन जणांचे नंबर सापडले आहेत. यातील दोन जण व्हॉट्सअ‍ॅप आणि एक जण फेसबूक युजरचा समावेश आहे. हे तिघे जण ‘राधे’ चित्रपटाची पायरेटेड कॉपी तयार करून सोशल मीडियावर विकत होते. एक लिंकवरून चित्रपट डाऊनलोड करून देण्यासाठी हे ठराविक रक्कम घेत होते. यासंदर्भात झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेसच्या अधिकाऱ्यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. दिलेल्या तक्रारीनुसार, या तिन्ही युजर्सविरोधात इनफॉर्मेशन टेक्नॉलॉजी एक्ट आणि कॉपीराइट एक्ट अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केलाय.

या तिघांमधल्या एका फेसबूक युजरने ‘राधे’ चित्रपटाची पायरेटेड कॉपी ५० रूपयांमध्ये विकण्याची ऑफर दिली होती. झी च्या टीममधील एकाने ही पायरेटेड कॉपी खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. एका अ‍ॅपच्या माध्यमातून या व्यक्तीकडून ५० रूपये घेतल्यानंतर चित्रपटाच्या पायरेटेड कॉपीची लिंक व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवली.

त्यानंतर लिंकवरील हे पाचही भाग फ्रान्स येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासण्यात आले. झी ५ ॲपवरून चित्रपटाची चोरी करण्यात आल्याचं समोर आलं आहे. सॉफ्टवेअरचा वापर करून या ॲपवरून चित्रपट डाऊनलोड करण्यात आला असून सोशल मीडियावर हा चित्रपट विकण्याच्या जाहिराती देखील दिल्या जात होत्या.