लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा दिल्यानंतरचा त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राहुल गांधी चित्रपटगृहात निवांत बसून पॉपकॉर्न खातानाचा हा व्हिडीओ आहे.
बुधवारी त्यांनी दिल्लीतल्या पीव्हीआर चाणक्य मल्टिप्लेक्समध्ये ‘आर्टिकल १५’ हा चित्रपट पाहिला. या थिएटरमधला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राहुल गांधी पॉपकॉर्न खात आयुषमान खुरानाचा चित्रपट पाहत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतंय. बुधवारीच त्यांनी ट्विटरवर चार पानी राजीनाम्याचं पत्र पोस्ट केलं होतं.
लोकसभा निवडणुकीतल्या दारूण पराभवानंतर राहुल गांधी अत्यंत अस्वस्थ झाले होते. त्यांनी कार्यकारिणीच्या बैठकीतच राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अनेक ज्येष्ठ नेत्यांनी त्यांचा हा प्रस्ताव स्वीकारला नाही. तरीही पराभवाची नैतिक जबाबदारी घेत राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा बुधवारी पक्षाकडे सोपवला.
‘आर्टिकल १५’ हा चित्रपट जातीपातीच्या राजकारणावर भाष्य करणार आहे. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफीसवर ३१ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 4, 2019 5:39 pm