02 March 2021

News Flash

रिमझिम..रिमझिम

पावसाळी गाण्यांचे हे असं आहे. तुम्हाला पाऊस आवडो न आवडो, पण पावसात चित्रित झालेली, पावसावर बेतलेली, पावसाचे गुण गाणारी गाणी तुम्हाला आवडतातच.

पावसाळी गाण्यांचे हे असं आहे. तुम्हाला पाऊस आवडो न आवडो, पण पावसात चित्रित झालेली, पावसावर बेतलेली, पावसाचे गुण गाणारी गाणी तुम्हाला आवडतातच. नेमेची येतो मग पावसाळाच्या धर्तीवर पावसाळी गाण्यांची प्रत्येकाची प्लेलिस्ट तयार होतेच. कुणाच्या त्या गाण्यांच्या यादीत असतात, ‘घनघन माला..’, ‘वासाचा पयला पाऊस’, ‘चिंब भिजलेले रूप सजलेले’ नाहीतर कुणाला आवडतात, ‘नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी’ किंवा कुणाला सुखावत असतो, ‘उनाड पाऊस अशांत पाऊस अधिक भिरभिरणारा पाऊस..’ प्रत्येकाचा पावसानुभव वेगळा तशीच प्रत्येकाची प्लेलिस्ट. आणि आपल्याकडे इतकी गाणी आहेत, की सगळ्यांच्या गाण्यांच्या यादीतलं एकेक गाणं जरी घ्यायचं ठरवलं तरी हा लेख जन्मात पूर्ण व्हायचा नाही. तेव्हा तूर्तास निवडक गाण्यांकडे वळू. उरलेल्या निवडक गाण्यांकडे पुढच्या पावसात बघू..

आपल्या बॉलीवूडमध्ये अनेक कलाकारांची, दिग्दर्शकांची, बॅनर्सची अख्खी कारकीर्द एखाद्या रापचिक पावसाच्या गाण्यावर उभी आहे. आठवा राज कपूरचं ‘प्यार हुआ इकरार हुआ..’ गाणं भन्नाट, तो भन्नाट, ती तर सुपर भन्नाट. अर्थात राज कपूरच्या कारकीर्दीतील इतर अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत यात वाद नाहीच. पण आजच्या नव्या नव्हाळीच्या म्हणजे नुकतंच नवतारुण्यात आलेल्या १३-१४ वर्षांच्या कोणाला विचारून पाहा, त्यांना राज कपूरशी जोडणारा पहिला दुवा हा बहुतांश वेळा ‘प्यार हुआ इकरार हुआ’ हाच असतो. नाहीतर मग करिना किंवा रणबीरचे आजोबा अशी त्यांची ओळख होते. तर ओळखीचं जाऊ दे तूर्तास. विषय भलतीकडे घसरेल अगदी पावसात निसरडय़ा झालेल्या रस्त्यांसारखा. तर विषय हा की, प्रत्येक काळातच पावसाने बॉलीवूडकरांना मदतीचा हात दिलेला आहे. म्हणजे अनेक ठिकाणी नायक-नायिकेला भेटण्यासाठी अवचित आलेला पाऊस हा एक ठरलेला प्लॉट असायचा. किशोरकुमार आणि मधुबालाची ‘एक लडकी भिगीभागीसी’ कोण विसरेल? सुंदर खाशी, सुबक, भिजलेली अशा वर्णनाच्या त्या नायिकेने तेव्हाच्या कृष्णधवल पावसालाही एक निराळंच ग्लॅमर चढवलं होतं. ‘रिमझिम गिरे सावन’मधला तरुण अमिताभ आणि गर्दीरहित, मोकळी मुंबई बघायला आजही आवडतं. ‘भिगी भिगी रातोंमे’ची मेलडी राजेश खन्ना-झीनतलाही शोभून दिसली आणि मग इंडिपॉपमध्ये त्याचं वेगळं व्हर्जन आल्यावर तिथल्या नवथर व्हिडीओ आर्टिस्टनाही तितकीच शोभली. ‘रिमझिम रिमझिम, रुमझुम रुमझुम’ म्हणत रुणझुणु रोमान्स करणारा अनिल कपूर, मनीषा कोईराला यांच्या सिनेमाला कित्ती र्वष झाली तरी तो रोमान्स जुना होतच नाही. ‘चक धूमधूम’ म्हणत नाचणारा शाहरूख आणि माधुरी तर कधी दमतच नाहीत. ‘टिपटिप बरसा पानी’ म्हणणाऱ्या रविनाच्या अदा आजही अनेकांना वेड लावतात.

पावसाच्या गाण्यांची हीच खासियत आहे. ही गाणी कधीच म्हातारी, जुनी वगैरे होत नाहीत. बरं या गाण्यांची आणखी एक गंमत म्हणजे, यातले शब्दही तेच ते असतात. पण त्यातली गंमत दरवेळी निराळी असते. म्हणजे ‘बरसो रे मेघा’ म्हणणाऱ्या ऐश्वर्याचा थाट निराळा असतो तर ‘काले मेघा पानी तो बरसाओ’ म्हणणाऱ्या गावकऱ्यांची विनवणी आणखीच निराळी.

इंडिपॉपच्या जमान्यातलं वेड लावणारं पावसाचं असंच एक गाणं म्हणजे शुभा मुद्गल यांचं ‘अब के सावन’ या गाण्याचं सादरीकरण. शुभा मुद्गलांचा आवाज आणि इंडिपॉपचा तो धुंद माहौल याने एकदम बहार उडवून दिली होती.

१९९९मध्ये आलेल्या ‘दहक’मधील ‘सावन बरसे तरसे दिल’ हे गाणंही अनेकांच्या आवडीचं आहे. या गाण्यातला पाऊस, प्रेमिकांसाठी दोस्त बनून येतो, संधी बनून येतो आणि चिंब भिजवून जातो. याच गाण्यातल्या सोनाली बेंद्रेचं ‘जो हाल दिल का’ हे असंच एक चिंब चिंब गाणं. पावसात चित्रित झालेलं, पण पावसाचा उल्लेखही शब्दांत नसलेलं. पाऊसगाण्यांचा असाही एक प्रकार. सोनालीच्या प्रेमात बेहाल होणाऱ्या त्या आमिरच्याच ‘फना’मधलं ‘देखो ना’ गाणं मात्र पाऊस शब्दांतून आणि चित्रीकरणातूनही दाखवणारं. या गाण्यातली दृष्टीहीन नायिका काजोल नायकासोबत खरा आणि भावनांचा पाऊस अनुभवते. तिच्या त्या अनुभवाचं एक देखणं चित्रण म्हणून या गाण्याकडे पाहता येईल. काजोलच्याही करिअरमध्ये पावसाच्या गाण्यांची बहार होतीच. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’मधलं सुरुवातीचं नायिकेच्या स्वप्नातल्या राजकुमाराचं वर्णन करणारं ‘मेरे ख्वाबोंमे जो आए’ असेल किंवा मग ‘तुझे देखा तो ये’ या गाण्याचे वेगवेगळे तुकडे असतील.. त्यातला पाऊस खरोखरच सिनेमात शोभणारा होता. चोप्रा कॅम्पमधून रोमान्सच्या निरनिराळ्या रेसिपीज तयार होत असत आणि त्या काळात ‘सजावटीसाठी कोथिंबीर’च्या धर्तीवर रोमान्स रेसिपीजमध्ये पाऊस असणं केवळ मस्ट असे. याचसोबत पावसाळी गाण्यांसोबत चिंब भिजलेली नायिका हे समीकरण म्हणजे हिटच होतं आणि आहे. नायकही बिचारा भिजलेला असायचा पण त्याच्या भिजण्याचं कॅमेऱ्याला काही फारसं कौतुक नव्हतं. सध्या एकं दरीतच चित्रपटातील नायिका बदलली आहे, ती वास्तवाच्या जवळ जाणारी अधिक असते. त्यामुळे ती सोनाक्षीसारखी ‘अकिरा’मध्ये अ‍ॅक्शनदृश्ये करताना दिसते. तर कधी तापसी पन्नूसारखी ‘बदला’ घेताना दिसते. फार कमी नायिकांच्या वाटय़ाला हल्ली पावसांत भिजून रोमॅन्टिक थरार दाखवण्याची संधी मिळते. अगदी डोक्याला ताण देऊन आठवायचं म्हटलं तर अलीकडच्या चित्रपटांमध्ये श्रद्धा कपूरचीच दोन गाणी चटकन नजरेसमोर येतात. ‘हाफ गर्लफ्रेण्ड’ चित्रपटातलं महाविद्यालयाच्या आवारातली गर्दी मागे टाकून एकटीच पावसात भिजणारी ‘बारीश’ या गाण्यातली श्रद्धा दिसते. तर ‘बागी’ चित्रपटातील ‘मै नाचू आज छम छम..’ म्हणणारी श्रद्धा अनेकांना ठेका धरायला लावते. ‘आशिकी २’मधलं ‘तुम ही हो..’ हे तिच्यावर आणि आदित्य रॉय कपूरवर चित्रित झालेलं गाणंही भर पावसातलंच आहे. तशी पावसांत चित्रित झालेली अशी अनेक गाणी आजही चित्रपटातून दिसतात, मात्र एकूणच बाहेरचा पाऊस रोमान्सपेक्षा चिडचिड, ठप्प लोकल, पाण्याने भरलेले रस्ते अशाच गोष्टी घेऊन येतो. या सगळ्यापासून दूर जायची संधी मिळाली तर पाऊस वेगळ्या तऱ्हेने जाणवेल. त्यामुळे वास्तवात आलेला हा मनांतला कोरडेपणा सध्या चित्रपटातील पाऊसगाण्यांनाही कोरडे करत सुटला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2019 11:15 pm

Web Title: rain song mpg 94
Next Stories
1 भाषेतलं भिजणं..
2 भयपर्यटन
3 ‘होस्टेजेस’चा भारतीय अवतार
Just Now!
X