महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. भाई-व्यक्ती की वल्ली असं या चित्रपटाचं नाव असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पोस्टर लाँच करण्यात आला.

‘भाईंबद्दल बोलण्याएवढा मी मोठा नाही आहे. पण मला आत्तापर्यंत ज्या काही मोजक्या चरित्रपट अर्थात बायोपिक भावल्या त्यातील एक म्हणजे रिचर्ड अॅटनबरो यांचा ‘गांधी’. मी हा चित्रपट किमान १५० वेळा पहिला आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये असताना कॉलेजला दांडी मारून हा चित्रपट प्लाझा चित्रपटगृहात एका पाठोपाठ एक असा पहिला. त्या चित्रपटाने मी भारावून गेलो आणि मला वाटते महेश मांजरेकर यांचा ‘भाई: व्यक्ती की वल्ली’ हा चित्रपट त्याच तोडीचा होईल. महेश हे पु. ल. आणि प्रेक्षक यांच्यामधील पूल यशस्वीपणे बांधतील,’ असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

हा चित्रपट पुढच्या वर्षी ४ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात भाई अर्थात पु. ल. देशपांडे यांची भूमिका सागर देशमुख तर सुनीताबाईंची भूमिका इरावती हर्षे साकारत आहेत. यामध्ये पु. ल. देशपांडे, सुनीताबाई देशपांडे यांच्याबरोबरच जवाहरलाल नेहरू, बाळासाहेब ठाकरे, बाबा आमटे, भीमसेन जोशी, दुर्गा भागवत, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व अशा अनेक व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे.