गेल्या दोन- अडीच महिन्यांपासून देशावर ओढावलेल्या संकटामुळे सर्वच क्षेत्रातील कामकाज ठप्प झालं होतं. त्यामुळे या काळात जणू काही साऱ्यांचीच आयुष्ये थांबली होती अस वातावरण निर्माण झालं होतं. संपूर्ण देशासह मुंबईत देखील भयाण शांतता पसरली होती. सहाजिकच या काळात कधीही न थांबणारी फिल्मसिटीदेखील बंद होती. अनेक चित्रपट, मालिका, नाटक, वेबसीरिज साऱ्यांचंच काम अर्ध्यावर राहिलं होतं. मात्र आता अनलॉकच्या दिशेने पावलं वळू लागली आहेत. त्यामुळेच नक्षलवादावर आधारित ‘नक्सल’ ही सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता राजीव खंडेलवाल लवकरच ‘नक्सल’ या आगामी सीरिजमध्ये झळकणार आहे. नक्षलवादावर आधारित या सीरिजचं लवकरच चित्रीकरण सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे या सध्या या सीरिजमधील सारेच कलाकार उत्साहात आहेत. विशेष म्हणजे या सीरिजमध्ये अॅक्शन आणि थ्रिलरचा पुरेपूर भरणा करण्यात आला आहे.
‘नक्सल’मध्ये राजीव खंडेलवाल मुख्य भूमिका साकारत असून तो पोलिसांच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सीरिजचे आठ एपिसोड असणार आहेत. दरम्यान, या सीरिजमध्ये राजीव खंडेलवाल ,टीना दत्ता ,आमीर अली, श्रीजीता डे आणि सत्यदीप मिश्रा (पहन) हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ही सीरिज झी5 वर प्रदर्शित होणार आहे.