नोटाबंदीचा निर्णय जेव्हा घेतला गेला तेव्हा अनेकांनी या निर्णयाचा विरोध केला होता. पण अभिनेते कमल हसन यांनी मात्र या निर्णयाचे स्वागत केले होते. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा निर्णय चुकीचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच नोटाबंदीच्या निर्णयाला समर्थन दिल्याने त्यांनी आता माफी मागितली आहे. तसेच जर मोदींनी आपला हा निर्णय चुकला असे मान्य केले तर मी स्वतः त्यांना दोनदा मानवंदना देईन असे कमल म्हणाले. एका तामिळ वृत्तपत्रामध्ये लिहिलेल्या लेखात त्यांनी म्हटले की, आपण केलेल्या चुका मान्य करणे हे मोठ्या नेत्याचे लक्षण आहे.

सुरूवातीला मी नोटबंदीला समर्थन दिले कारण यातून काळ्या पैशाला आळा बसेल असे वाटले होते. त्यामुळेच थोडे त्रास सहन केले तरी चालतील. पण प्रत्यक्षात तसे झालेले दिसत नाही. सर्वसामान्य माणसांना याचा त्रास तर झालाच पण त्यातून बाहेर काही आले नाही. अर्थव्यवस्थेचे जाणकार असलेल्या माझ्या मित्रांनी मी केलेल्या समर्थनाची टीकाही केलेली. ज्या पद्धतीने ही नोटबंदी लागू केली गेली ते चुकीचे होते असे त्यांचे म्हणणे होते. काही दिवसांपूर्वीच कमल हसन यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिले होते.

दरम्यान काही दिवसांपूर्वी कमल हसन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट झाली होती. या भेटीबद्दल बोलताना ‘दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि अभिनेता कमल हसन हे दोघेही ‘झीरो’ आहेत. या दोघांच्या भेटीला काहीही अर्थ नाही,’ अशी टीका भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली होती. दोन शून्यांची भेट होऊन काहीही उपयोग होणार नाही असेही त्यांनी म्हटले होते. कमल हसनने आधी भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींची भेट घेतली होती. या भेटीनंतर मात्र अरविंद केजरीवाल यांनी कमल हसनच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली होती . नेमक्या याच भेटीवर सुब्रमण्यम स्वामींनी निशाणा साधला होता.