मॉडेल पौलाने दिग्दर्शक साजिद खानवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित पौलाने साजिदवर धक्कादायक आरोप केले आहेत. “मी टू मोहिमेदरम्यान मी गप्प बसले होते. कारण त्यावेळी इंडस्ट्रीत माझा कोणी गॉडफादर नव्हता आणि मला माझ्या कुटुंबीयांसाठी काम करणं गरजेचं होतं. पण आता माझे आई-वडील सोबत नाहीत, मी माझ्यासाठीच कमावतेय. त्यामुळे आता उघडपणे सत्य बोलू शकते,” असं म्हणत पौलाने साजिदवर आरोप केले. पौला सतरा वर्षांची असताना साजिदने तिचं शोषण केलं, असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं.

“साजिद मला अश्लील मेसेज पाठवायचा. मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा. त्याने मला त्याच्यासमोर विवस्त्र व्हायला सांगितलं. हाऊसफुल चित्रपटात भूमिका देण्याच्या बदल्यात साजिदने मला विवस्त्र व्हायला सांगितलं. त्याने असं किती महिलांसोबत केलंय, हे देवच जाणो. मी कोणाच्या सांगण्यावरून हे सर्व उघड करत नाहीये. तेव्हा मी बोलू शकले नव्हते पण आता पुरे झालं. त्याला कारागृहात डांबलं पाहिजे”, अशी पोस्ट पौलाने लिहिली.

२०१८ मध्ये जेव्हा बॉलिवूडमध्ये मी टूची मोहिम सुरू झाली, तेव्हा साजिद खानवर पत्रकारांसहित काही मॉडेल व अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. परिणामी त्याला ‘हाऊसफुल ४’च्या दिग्दर्शकपदावरून हटवण्यात आलं. त्यानंतर साजिद सार्वजनिक कार्यक्रमात झळकला नाही. आता पुन्हा एकदा त्याच्यावर आरोप झाल्याने सोशल मीडियावर साजिदला अटक करण्याची जोरदार मागणी होत आहे.