काळवीट शिकार प्रकरणी सलमान खान दोषी ठरला असून न्यायालयाने त्याला पाच वर्षांची शिक्षा आणि १० हजारांचा दंड सुनावला आहे. सलमानच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार असून त्याला आजची रात्र कारागृहात घालवावी लागणार आहे. या प्रकरणात अन्य आरोपींना दोषमुक्त केले आहे. यामुळे सोनाली बेंद्रे, नीलम आणि अभिनेता सैफ अली खान यांना दिलासा मिळाला आहे. आता सेंट्रल जेलमध्ये सलमानची रवानगी होणार आहे. याच जेलमध्ये आसाराम बापूही आहे. त्यामुळे ज्या बराकमध्ये आसाराम बापू आहे त्याच बराकमध्ये आता सलमान खानही राहणार असे म्हटले जात आहे.

सलमानला सेंट्रल जेलच्या बराक क्रमांक दोनमध्ये ठेवले जाऊ शकते. याच बराकमध्ये आसाराम बापूही कैद आहेत. मुलींच्या लैंगिक शोषणाप्रकरणी आसाराम बापू तुरुंगवास भोगत आहे. सलमान खान आतापर्यंत १८ दिवस तुरूंगात राहिला आहे. पण तो सलग १८ दिवस तुरूंगात न राहता एक- दोन दिवसांप्रमाणे त्याने १८ दिवस तुरुंगात घालवले आहेत. मागच्यावेळी शिक्षेनंतर सलमान याच तुरुंगात सात दिवस राहिला होता. आता त्याचे या तुरुंगात प्रवेश करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये सलमान तुरुंगात शिरताना दिसत आहे. काळ्या रंगाचं शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स घातलेल्या सलमानला प्रसारमाध्यमांपासून वाचवत सुरक्षा रक्षक तुरूंगात नेत होते. यावेळी सलमानच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्तही करण्यात आला होता.

प्रकरण काय?
‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे राजस्थानला गेले होते. त्यावेळी त्यांनी शिकार केली. काळवीटाच्या हत्येवर स्थानिक बिष्णोई समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर सलमान खान आणि अन्य सहकलाकारांविरोधात गुन्हा दाखल झाला. सलमानवर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ५१ खाली आरोप असून त्यासाठी कमाल ६ वर्षे कैदेच्या शिक्षेची तरतूद आहे.