फोर्ब्सने 100 श्रीमंत भारतीय सेलिब्रेटींची यादी जाहीर केली असून बॉलिवूड दबंग सलमान खानने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. सलमान खान सलग तिसऱ्यांदा फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंत भारतीय सेलिब्रिटीजच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आला आहे. विशेष म्हणजे बॉलिवूड किंग शाहरुख खानला पहिल्या 10 मध्येही स्थान मिळू शकलेलं नाही.

अभिनेत्यांनी केलेल्या कमाईच्या आधारे फोर्ब्सकडून ही यादी जाहीर केली जाते. ही यादी जाहीर करण्यासाठी फोर्ब्सने 1 ऑक्टोबर 2017 ते 30 सप्टेंबर 2018 दरम्यान अभिनेत्यांनी केलेल्या कमाईच्या आकड्याची दखल घेतली आहे.

2018 मध्ये सलमान खानने कमाईच्या बाबतीत बॉलीवुडमधील सर्व अभिनेत्यांना मागे टाकले असून तब्बल 253.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सलमानच्या ‘टायगर जिंदा है’ आणि ‘रेस 3’ चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती ज्याचा फायदा सलमानला झाला आहे. याव्यतिरिक्त सलमानकडे अनेक जाहिराती आहेत. सलमानच्या कमाईतील 8.60 टक्के भाग जाहिरातींच्या माध्यमातून मिळालेला आहे.

सलमान खाननंतर यादीत दुसरा क्रमांक लागला आहे तो भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा. विराट कोहलीने एकूण 228.09 कोटींची कमाई केली आहे. आधीच्या वर्षाशी तुलना करता कमाईच्या आकडेवारीत 116.53 टक्क्यांची वाढ झाली आहे. खिलाडी अक्षय कुमार 185 कोटींसहित तिसऱ्या क्रमांकावर आहे.

2017 मध्येही एकही चित्रपट रिलीज न झाल्याने 2017 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणारा शाहरुख यादीत मागे पडला आहे. शाहरुखने 56 कोटींची कमाई केली असून तेराव्या क्रमांकावर स्थान मिळालं आहे.

नुकतंच लग्न झालेल्या दीपिकाने पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवलं असून 112.8 कोटींची कमाई करत भारतातील पहिली सर्वाधिक कमाई करणारी महिला सेलिब्रिटी ठरली आहे. दीपिका चौथ्या क्रमांकावर आहे. यानंतर महेंद्रसिंह धोनीचा क्रमांक असून त्याने 101.77 कोटींची कमाई केली आहे. यानंतर अनुक्रमे आमीर खान (97.50), अमिताभ बच्चन (96.17), रणवीर सिंह (84.7), सचिन तेंडुलकर (80) आणि अजय देवगण (74.50) यांचा क्रमांक आहे.