करणी सेनेकडून झालेल्या तीव्र विरोधानंतर अखेर ‘पद्मावत’ प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफीसवर चांगली कमाईसुद्धा करू लागला. चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेल्या दीपिका पदुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंग यांच्या अभिनयालाही प्रेक्षक-समीक्षकांकडून दाद मिळत आहे. एकीकडे रणवीरने साकारलेल्या खलनायकी भूमिकेला अधिकाधिक प्रतिसाद मिळत असतानाच दुसरीकडे दीपिका- शाहिदमधील केमिस्ट्रीसुद्धा प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. मात्र, ‘पद्मावत’च्या शूटिंगदरम्यान सेटवर आपण कोणी बाहेरची व्यक्ती आहोत की काय, अशी भावना मनात आल्याचे शाहिदने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले.

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, दीपिका आणि रणवीर यांनी आधी ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ या दोन चित्रपटांसाठी एकत्र काम केले होते. त्यामुळे साहजिकच तिघांमध्ये मैत्रीपूर्ण वातावरण होते. शिवाय रणवीर आणि शाहिदमध्ये सेटवर भांडणं झाल्याच्या चर्चाही मध्यंतरी ऐकायला मिळत होत्या. यासंदर्भात ‘डीएनए’ला दिलेल्या मुलाखतीत शाहिद म्हणाला की, ‘आतापर्यंत मी ज्या दिग्दर्शकांसोबत काम केले, त्या सर्वांचा मी आवडता अभिनेता होतो. मात्र, पहिल्यांदाच मला चित्रपटाच्या टीममधला नसल्यासारखे, एकटे पडल्याचे जाणवले. आधीपासून एकमेकांना चांगल्याप्रकारे ओळखणारे सहकलाकार असल्यावर आपल्याला त्यांच्यात मिसळण्यास थोडा वेळ लागतोच.’

शाहिदने ‘पद्मावत’मध्ये महारावल रतन सिंहची भूमिका साकारली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने कमाईत १०० कोटींचा आकडा पार केला आहे. दीपिकासाठीही ‘पद्मावत’ विशेष असून १०० कोटींची कमाई करणारा हा तिचा सातवा चित्रपट ठरला आहे. येत्या काळातही हा चित्रपट चांगली कमाई करणार असल्याचा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषकांनी वर्तवला आहे.