अभिनेता शाहिद कपूर याने मीरा राजपूत हिच्याशी गुपचूप साखरपुडा केला होता. त्याच पद्धतीने शाहिदची लहान बहिण सना कपूर हिने एका परफॉर्मिंग आर्टिस्टसोबत गुपचूप साखरपुडा केल्याचे म्हटले जातेय.

करण जोहरच्या शानदार या चित्रपटाने भाऊ शाहिदसह बॉलीवूडमध्ये पदार्पण करणा-या सनाने अभिनेता मयंक पाहवा याच्याशी साखरपुडा केल्याची सध्या बॉलीवूडमध्ये चर्चा आहे. मयंक हा अभिनेता मनोज पाहवा आणि सीमा पाहवा यांचा मुलगा आहे. पिंकविला या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, दिवंगत अभिनेते ओम पुरी यांच्या पत्नी नंदिता पुरी यांनी चुकून या गोष्टीचा खुलासा केला. नंदिता यांनी म्हटलेले की, आम्ही पंकज कपूर यांची मुलगी आणि पाहवा यांच्या मुलाच्या साखरपुड्याला जाणार होतो. ओम यांनी मला फोन केला होता. पण मी तेथे पोहचण्याआधीच ते घरी आले होते. अशा प्रकारे पंकज कपूर यांच्या मुलीचा म्हणजेच सनाचा साखरपुडा झाल्याचे वृत्त समोर आले.

image

नुकताच शाहिद कपूर, कंगना रणौत आणि सैफ अली खान यांच्या रंगून चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘रंगून’ या बहुचर्चित ट्रेलरमधून ‘जानबाज जुली’च्या भूमिकेत दिसणारी कंगना अनेकांचेच लक्ष वेधत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळ दाखविण्यात आलेल्या या चित्रपटामध्ये कंगना १९४० दरम्यानच्या एका चित्रपट नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, शाहिद या चित्रपटामध्ये जमादार नवाब मलिक या भूमिकेत झळकणार आहे. गतकाळातील मुंबई नगरीची झलकही या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. सैफही ‘रंगून’च्या ट्रेलरमध्ये खानदानी आणि तितक्याच प्रभावी लूकमध्ये दिसत आहे. १९४४ या वर्षी झालेल्या एका लढाईच्या दृश्याने या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात होते. या चित्रपटात एक वेगळाच काळ साकारण्यात आल्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

तसेच, ‘रंगून’ या चित्रपटातील सर्वात पहिले गाणेही प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘ब्लडी हेल’ असे बोल असणाऱ्या या गाण्यात कंगनाचा हटके लूक पाहावयास मिळत आहे. ‘हंटरवाली’च्या अवतारात कंगना या गाण्यात थिरकताना दिसत आहे. गुलजार यांनी हे गाणे लिहिले असून विशाल भारद्वाज यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. सुनिधी चौहानने गायलेल्या या गाण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा विशाल भारद्वाज आणि गुलजार ही गीतकार आणि संगीतकाराची जोडी एकत्र आली आहे. सोशल मीडियावरही सध्या या गाण्याचीच चर्चा सुरु आहे.