सध्या जगभरात व देशात करोना विषाणूचं संकट उभं असताना गुढीपाडव्याची खरेदी करायला घराबाहेर पडू नका, असं आवाहन ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलंय. देशभरात दिवसेंदिवस करोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना सर्वांनी गंभीरता लक्षात घ्या असंही त्यांनी म्हटलंय. फेसबुकवर पोस्ट लिहित शरद पोंक्षे यांनी हे आवाहन केलंय.

शरद पोंक्षेंची फेसबुक पोस्ट-

नमस्कार परवा जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिल्यानंतर सायं ५ वा काही मुर्खांनी सायं रस्त्यावर उतरून जल्लोश साजरा केला ,मिरवणुका काढल्या,आणि सगळ्यावर पाणी टाकलं. म्हणून आज हे लिहावंस वाटलं. कारण उद्या गुढीपाडवा, राष्ट्रीय दिनदर्शिकेनुसार नुतनवर्षाची सुरुवात. चैत्रशुध्द प्रतिपदा. फक्त हिंदूंचं नवीन वर्ष नाही, तर हे भारताचं नवीन वर्ष. दर वर्षी हा सण आपण वाजत गाजत साजरा करतो सकाळी स्वागत यात्रा काढतो. आदल्या दिवशी खरेदी साठी बाजारात गर्दी करतो.पण ह्या वर्षी हे सगळं करायच नाहीये.देश व जग कोरोना च्या महासंकटाशी सामना करतोय. आपण सरकारी आदेश पाळलेच पाहिजेत. हे कंपलसरी आहे. जे घरात उपलब्ध आहे त्यात काय ते गोड पदार्थ बनवा. जे साहित्य उपलब्ध आहे त्यात गुढी उभी करा.त्याची खरेदी करायला बाहेर पडायची गरज नाही. देव रागवत नाही की चिडत नाही. धर्मही भ्रष्ट होत नाही. संकट दाराशी उभं आहे.कधीही घरात प्रवेश करू शकतं. जर ते आत आले तर मग आपल्याच गुढ्या उभ्या कराव्या लागतील. ह्यातली गंभीरता लक्षात घ्या.कोरोना संकट टळलं की मग एक दिवस गुढीपाडवा साजरा करू. पण आता घरातल्या घरातच जे साहित्य उपलब्ध आहे त्यात करूया. ही कळकळीची विनंती आहे. हे सर्वांपर्यंत पोचवा.

आणखी वाचा : दुसऱ्यांदा कनिका कपूरचा करोना व्हायरसच्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

दरम्यान, राज्यात कस्तुरबा रूग्णालयात करोनाचा चौथा बळी गेला आहे. कस्तुरबा रूग्णालयात दाखल असलेल्या एका ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.