बॉलिवूडचे प्रसिद्ध पार्श्वगायक अभिजीत भट्टाचार्य यांच्या मुलाला करोनाची लागण झाली आहे. ध्रुव असं त्यांच्या मुलाचं नाव असून मुंबईतील एका रेस्तराँचा तो मालक आहे. ध्रुवला करोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. मात्र परदेशी प्रवास करण्याच्या उद्देशाने त्याने चाचणी करून घेतली. त्यात त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. करोना रिपोर्ट आल्यानंतर ध्रुवला घरातच क्वारंटाइन करण्यात आलं असून पुढील उपचार करण्यात येत असल्याची माहिती अभिजीत यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिली.

अभिजीत एका शूटिंगनिमित्त कोलकाताला गेले आहेत. त्यांनीसुद्धा स्वत:ची करोना चाचणी केली. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचं त्यांनी सांगितलं. शूट सुरू होण्यापूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून क्रू मेंबर्स व शूटमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांची करोना चाचणी करण्यात येते. त्यात त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक देशात वाढतच आहे. ३० ते ३५ हजारांनी वाढणारी रुग्णसंख्या आता ५० हजारांच्या घरात गेली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील २४ तासांत तब्बल ४९ हजार ३१० करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. ही आतापर्यंतची सर्वात मोठी करोनाबाधितांची वाढ आहे. गुरुवारी देशात करोनामुळे ७४० जणांचा मृत्यू झाला आहे.