लॉकडाउनच्या काळात आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या लोकांसाठी अभिनेता सोनू सूदने मदतीचा हात दिला. सोनू सूदने कशाचीही पर्वा न करता अगदी करोनाच्या पहिल्या लाटेपासून ते आतापर्यंत लोकांना भरभरून मदत करतोय. पण आता देशात परिस्थिती गंभीर बनली असून सगळीकडे ऑक्सिजन अभावी अनेकांचे जीव जात आहेत. हे चित्र पाहून अभिनेता सोनू सूद भडकला आणि थेट चीनलाच त्याने प्रश्न केला. त्याने केलेल्या प्रश्नावर चीननेही उत्तर दिलंय.

चीनला केला थेट सवाल
करोना काळात लोकांना मदत करण्यासाठी अभिनेता सोनू सूद गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर बराच सक्रीय असतो. एका नेटकऱ्याने त्याला सोशल मीडियावर टॅग करत शेकडो ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स हे चीनवरून भारतात आणले जात आहेत, पण यात चीनकडून मुद्दाम अडथळा आणला जात असल्याचं सांगितलं. यावर संतापून अभिनेता सोनू सूदने ट्विट करत चीनला थेट सवाल केलाय. या ट्विटमध्ये त्याने लिहिलंय, “शेकडो ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स भारतात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, तुम्ही तिथे आमचे कितीतरी कॉन्सन्ट्रेटर्स अडवले आहेत आणि इथे भारतात प्रत्येक मिनिटाला लोकांचे जीव जात आहेत…मी विनंती करतो की आमचे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स भारतात आणण्यासाठी आमची मदत करा जेणेकरून आम्ही लोकांचे जीव वाचवू शकू…”. या ट्विटमध्ये अभिनेता सोनू सूदने चीनचे राजदूत आणि चीन देशाचे मंत्रालय यांना टॅग केलंय.

चीनकडून आलं हे उत्तर
अभिनेता सोनू सूदने केलेल्या या प्रश्नावर चीनचे राजदूत सुन वेइदांग यांनी उत्तर दिलंय. अभिनेता सोनू सूदच्या ट्विटला रिप्लाय करत त्यांनी लिहिलं, “सूद, तुमच्या ट्विटनंतर आम्हाला ही माहिती मिळाली आहे, कोविड १९ विरोधात भारताच्या लढ्यात चीन सर्वतोपरीने मदत करेल, माझ्या माहितीनुसार चीनमधून भारतसाठी जाणाऱ्या सर्व कार्गो फ्लाईट्स सुरळीत सुरू आहेत, गेल्या दोन आठवड्यांपासून चीनमधून भारतसाठीच्या कार्गो फ्लाईट्स उत्तम काम करत आहेत.”

अभिनेता सोनू सूद म्हणाला, “धन्यवाद!”
चीनकडून आलेल्या उत्तराला रिप्लाय करत सोनू सूदने ट्विट केलं, “तुमच्या प्रतिक्रीयेसाठी धन्यवाद! ही अडचण दूर करण्यासाठी मी तुमच्या कार्यालयाच्या संपर्कात आहे, तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल खूप आभार”