करोना विषाणूचं वाढतं संक्रमण आणि अतिवृष्टीमुळे लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीत अभिनेता सोनू सूदने गरीबांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अलिकडेच एका शेतकऱ्याने त्याच्याकडे चक्क म्हशी खरेदी करण्यासाठी मदत मागितली होती. क्षणाचाही विलंब न करता त्याने त्या शेतकऱ्याची मदत केली. लक्षवेधी बाब म्हणजे आयुष्यातील पहिली कार खरेदी करताना तो जितका उत्साही होता त्यापेक्षा अधिक उत्साह त्याला या म्हशी खरेदी करताना जाणवला.

अवश्य पाहा – कुंडली न जुळल्यानं अभिनेत्रीने मोडलं लग्न

“चंपारण येथील भोलाने पूरामध्ये आपला मुलगा आणि म्हशी गमावल्या. त्याच्या उत्पन्नाचं एकमेव साधन त्याने या पूरामध्ये गमावलं. सोनू सूद यांनी कृपया भोलाला म्हशी खरेदी करण्यासाठी मदत करावी. जेणेकरुन तो आपल्या कुटुंबीयांचे पालनपोषण करु शकेल.” अशा आशयाचं ट्विट करुन सोनूकडे मदत मागण्यात आली होती. या गरीब व्यक्तीला सोनूने मदत केली आहे. “इतका उत्साही आयुष्यातील पहिली कार खरेदी करताना देखील नव्हतो, जितका उत्साह मला म्हशी खरेदी करताना जाणवला. लवकरच मी बिहारला येईन तेव्हा या म्हशीचं एक ग्लास ताजं दूध नक्की घेईन.” अशा आशयाचं ट्विट करुन सोनूने त्या शेतकऱ्याला प्रतिक्रिया दिली आहे.

सोनू सूदने लॉकडाउनच्या काळात विविध ठिकाणी अडकलेल्या देशभरातील शेकडो मजुरांना आणि विद्यार्थ्यांना बस आणि ट्रेनच्या माध्यमातून त्यांच्या गावी पोहोचवलं आहे. शिवाय त्यांच्या रोजगारासाठीही तो प्रयत्न करत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ही सोय तो विनामुल्य देत आहे. “शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचेपर्यंत मी शांत बसणार नाही.” असं त्याने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. आनंदाची बाब म्हणजे या वाक्याचे तो तंतोतंत पालन करत आहे. यापूर्वी सोनुने १५०० PPE किट्सची मदत केली होती. तसेच आपले हॉटेल करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी खुले करुन दिले होते.