बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सोशल मीडियावर सतत चर्चेत असतो. तो कधी गरिबांना मदत करतो तर कधी यूजर्सला भन्नाट रिप्लाय देताना दिसतो. सोनू सूदने लॉकडाउनच्या काळात अनेक प्रवासी मजूर, कामगारांना त्यांच्या घरी पोहोचवण्यास मदत केली. त्यानंतर सोनू सूदने अनेक गरिबांना सोशल मीडियाद्वारे देखील मदत केली. आता सोनू सूदने उत्तराखंड मधील चमोली जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेतील लोकांना मदतीचा हात दिला आहे.

उत्तराखंडमध्ये नंदादेवी हिमकड्याचा काही भाग कोसळल्याने प्रलयामध्ये टिहरी जिल्ह्यातील आलम सिंग पुंडरी यांचा मृत्यु झाला होता. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा ते आलम बोगद्यात होते. ते इलेक्ट्रिशियन असल्याचे सांगण्यात येत आहेत. आलम यांच्या निधनाने त्यांचे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना चार मुली असून वडीलांची छत्रछाया नसल्याने त्या अनाथ झाल्या आहेत. आता या मुलींच्या भविष्याची जबाबदारी घेण्यासाठी सोनू सूद पुढे आला आहे. सोनू सूदच्या टीमने सांगितले की सोनू या चारही मुलींना दत्तक घेणार आहे. सोनू त्यांच्या शिक्षणापासून ते त्यांच्या लग्नापर्यंतची सगळी जबाबदारी घेणार आहे.

सोनू सूदने एका मुलाखतीत यावर वक्तव्य केलं आहे. “प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी आहे की अशा कठीण परिस्थितीत त्यांनी पुढे येऊन शक्य तितक्या लोकांची मदत केली पाहिजे”, असे त्याने म्हटले आहे. सोनूने उचलले हे पाऊल कौतुकास्पद आहे. चाहत्यांनी त्याचे कौतुक केले आहे.