‘मणिकर्णिका’ चित्रपटाचा मी भाग नाही हे दु:ख आजही खूप सलतंय असं म्हणत अभिनेता सोनू सूदनं आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘मणिकर्णिका’चं चित्रीकरण अर्ध्यावर सोडून सोनू या चित्रपटातून तडकाफडकी बाहेर पडला होता. त्यानंतर कंगना आणि सोनूमध्ये शाब्दिक युद्धही रंगलं होतं. आता मात्र या चित्रपटाचा भाग नसल्याचं वाईट वाटतं असं म्हणत सोनूनं कंगना आणि चित्रपटाच्या टीमला यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
कंगनानं ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांशी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ‘मणिकर्णिका’मध्ये सोनू सूद देखील महत्त्वाच्या भूमिकेत होता मात्र त्यांनं चित्रीकरण अर्ध्यावर आलं असताना माघार घेतली. ‘एका महिला दिग्दर्शिकेच्या हाताखाली काम करणं सोनूला जमलं नाही. त्याचा पुरुषी अहंकार दुखावला गेला’ अशी बोचरी प्रतिक्रिया त्यानंतर कंगनानं दिली होती. तर सोनू हा ‘मणिकर्णिका’च्या चित्रीकरणासोबतचं त्यावेळी सिम्बाचं चित्रीकरणही करत होता. दोन्ही चित्रपटात सोनूचा लूक हा वेगळा होता. या दोघांमधलं संतूलन ठेवणं सोनूला अवघड होत होतं त्यामुळे त्यानं एकच चित्रपट करायचा ठरवलं अशी माहिती नंतर सोनूच्या जवळच्या व्यक्तीनं देत कंगनाचे आरोप खोडून लावले होते.
या गोष्टीला आता बरेच महिने उलटले. मात्र आता सोनूनं सारा वाद मागे ठेवत कंगना आणि तिच्या टिमला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘काही गोष्टी या तुमच्या नशीबात नसतात. मणिकर्णिका चित्रपटाचा मी भाग व्हावं हे माझ्या नशीबातच नव्हतं. मी आयुष्यातील खूप सुंदर अनुभवांना मुकलो आहे कारण हा चित्रपट माझ्यासाठी तितकाच महत्त्वाचा होता पण मला या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा द्यायच्या आहेत हा चित्रपट यशस्वी होईल याची मला खात्री आहे’ असं म्हणत सोनूनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 24, 2019 12:36 pm