करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशभरातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. यामध्ये अभिनेता सोनू सूद फारच चर्चेत आहे. मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याची जबाबदारी त्याने स्विकारली आहे. त्याच्या या कामाचे प्रचंड कौतुक केले जात आहे. दरम्यान एका महिलेने त्याला पार्लमध्ये नेऊन सोडण्याची विनंती केली. तिच्या या विनंतीवर सोनूने देखील गंमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे.

सोनूजी गेल्या दोन महिन्यांपासून मी पार्लमध्ये गेले नाही. कृपया मला तिथे नेऊन सोडता का? अशी विनंती या महिलेने केली होती. या विनंतीवर सोनू म्हणाला, “सलॉनमध्ये जाऊन काय करशील? सलॉन चालवणाऱ्याला तर मी गावाला सोडून आलोय. त्याच्या मागोमाग गावाला जायचं असेल तर बोला.” त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सोनूने महाराष्ट्र सरकारकडून विशेष परवानगी घेऊन काही गाड्यांची सोय केली आहे. या गाड्यांमार्फत महाराष्ट्रातील मजूरांना त्यांच्या गावी नेऊन सोडले जात आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ही सोय तो विनामुल्य देत आहे. “शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचेपर्यंत मी शांत बसणार नाही.” असं त्याने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. आनंदाची बाब म्हणजे या वाक्याचे तो तंतोतंत पालन करत आहे. त्याच्या मदतीमुळे मजुरांना त्यांच्या गावी सोडण्याचा महाराष्ट्र सरकारवरचा भार काही प्रमाणात कमी झाला आहे असे म्हटले जात आहे. यापूर्वी सोनुने एक हजार ५०० PPE किट्सची मदत केली होती. तसेच आपले हॉटेल करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी खुले करुन दिले होते.