बॉलिवूड चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका बजावणाऱ्या सोनू सूदची आणखी एक बाजू लॉकडाउन काळात समोर आली. आपल्या घरापासून दूर अडकलेल्या अनेक परप्रांतीय मजुरांना सोनूने स्वतःच्या खर्चाने त्यांच्या घरी पाठवलं. या कामगारांसाठी बस, रेल्वे गाड्यांची तिकीटं तर कधीकधी विमानाची तिकीटं काढून देत सोनूने त्यांना घरी पाठवलं. या कामगिरीनंतर सर्वच स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता. कामगारांना मदत करण्याव्यतिरीक्त या काळात सोनूने अनेक शेतकरी कुटुंबांनाही मदत केली. यानंतर सोनू आणखी एक महत्वाची जबाबदारी घेणार आहे. तेलंगणातील भुवनगिरी जिल्ह्यातील आई-वडील गमावलेल्या ३ मुलांची जबाबदारी सोनूने स्विकारली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून या ३ मुलांबद्दल सोनूला माहिती कळाली होती. ज्यावर प्रतिसाद देत, सोनूने ही ३ मुलं आता अनाथ नाहीत ते माझी जबाबदारी आहेत असं जाहीर केलं. काही दिवसांपूर्वीच या ३ मुलांचे आई-वडील वारले…सध्या ही मुलं आपल्या आजीसोबत राहत असली तरीही वृद्धापकाळाने आजीची तब्येतही नेहमी खराब असते. दरम्यान तेलंगणातील पंचायत राज मंत्री एरबेल्ली दयाकर राव यांना या परिस्थितीबद्दल समजताच, त्यांनी स्थानिक आमदरांकरवी या मुलांना मदत पाठवली आहे. दरम्यान सोनूने घेतलेल्या या निर्णयामुळे त्याचं सोशल मीडियावर कौतुक होताना दिसत आहे.