२०२० या वर्षात अनेक घडामोडी घडल्या. करोना विषाणूनमुळे ओढावलेल्या संकटामुळे लॉकडाउन घोषित करण्यात आला. ज्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली. मात्र, या काळात आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या लोकांसाठी अभिनेता सोनू सूदने मदतीचा हात दिला. सोनू सूदने कशाचीही पर्वा न करता लोकांना मदत केली आणि तो अनेकांसाठी सुपरहिरो ठरला. सध्या सोनू सूद आणि कंगना रणौत यांच्यात शाब्दिक वाद सुरु असल्याचं दिसून येत आहे. अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीत सोनूने अप्रत्यक्षरित्या कंगनाला टोला लगावला आहे

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कंगना रणौतने कलाविश्वातील अनेकांवर टीकास्त्र डागलं होतं. यात “बॉलिवूडमधील ९९ टक्के लोक अंमली पदार्थांचे सेवन करतात,” असं वक्तव्य कंगना रनौतने केलं होतं. तिच्या याच वक्तव्यावरुन सोनू सूदने अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.

“जेव्हा आपल्याच विश्वातील लोक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात त्यावेळी मला खरंच वाईट वाटतं. आपण या चित्रपटसृष्टीसाठी आपलं घर, कुटुंब सारं काही सोडून येत असतो. या इंडस्ट्रीमुळे आपली स्वप्न पूर्ण झाली आहेत. मग त्याच विश्वातील लोकांच्या विरोधात आपण कसं काय बोलू शकतो. तुम्हीच विचार करा या सगळ्याचा नंतर काय परिणाम होत असेल”, असं सोनू सूद म्हणाला.

पुढे तो म्हणतो, “आम्ही सगळे एक मोठ कुटुंब आहोत असा विचार करतो. पण आम्हाला सगळ्यांना एकत्र ठेवणारी व्यक्ती किंवा दुवा हरवला आहे. सगळे स्वत:ला इतरांशी जोडण्याचा प्रयत्न करत असतात. कोणीही तुमची स्तुती करायला किंवा सल्ला द्यायला येणार नाही.”

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अभिनेत्री कंगना रणौतने कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींवर टीकास्त्र डागलं होतं. तसंच कलाविश्वातील ९९ टक्के लोक अंमली पदार्थाचं सेवन करतात असा वक्तव्यही कंगनाने केलं होतं. तिच्या या वक्तव्यानंतर कलाविश्वातील अनेकांनी तिला खडेबोल सुनावले होते.