परप्रांतीय जेव्हा मुंबईत फिरण्यासाठी, मुंबई बघण्यासाठी येतात तेव्हा आवर्जून अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान यांची घरं पाहतात. तर दर रविवारी बिग बींच्या बंगल्याबाहेर त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी होते. मात्र आता हे चाहते मुंबईत सोनू सूदचं घर कुठे आहे, हे शोधणार असं ट्विट एका नेटकऱ्याने सोनू सूदला टॅग करत केलं. यावर सोनू सूदने दिलेल्या उत्तराने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सोनू सूद लॉकडाउनमुळे अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचं काम नि:स्वार्थपणे करत आहे. तो स्वत: या मजुरांच्या संपर्कात असून त्यांच्यासाठी बसेसची सुविधा करत आहे. आतापर्यंत त्याने अनेक मजुरांना त्यांच्या घरी सुखरुपरित्या पोहोचवलं आहे. त्याच्या या कामाचं सर्वच स्तरांतून खूप कौतुक होत आहे. यावर एका नेटकऱ्याने सोनू सूदला टॅग करत ट्विट केलं, ‘हे सगळं ठीक झाल्यानंतर तुम्हाला दर रविवारी सुट्टी घ्यावी लागेल. लोक तुम्हाला भेटायला येतील. मुंबईत फिरायला येणारे लोक सोनू सूदचं घर कुठे आहे हे विचारतील.’ या ट्विटला उत्तर देत सोनू सूद म्हणाला, ‘मित्रा, ते काय माझ्या घरी येतील, मीच त्या सर्वांच्या घरी जाणार आहे. माझ्या भावांवर खूप साऱ्या पराठ्यांची, पान आणि चहाची उधारी बाकी आहे.’ सोनू सूदच्या या उत्तरामुळे चाहत्यांमध्ये सेलिब्रिटीची एक नवी प्रतिमा तयार झाली आहे.

आणखी वाचा : लोकांना आता तुला व्हिलन म्हणून पाहायचं नाहीये; यावर सोनू सुद म्हणतो….

पडद्यावर क्रूर खलनायक साकारणारा सोनू सूद खऱ्या आयुष्यात ‘हिरो’ बनला आहे. त्याने केलेल्या मदतीबद्दल अनेकांनी त्याचे आभार मानले आहेत.