गेल्या काही वर्षांत रंगभूमीवरून अस्सल विनोद हरवला आहे, निखळ विनोदाची जाणच राहिलेली नाही, अशी चर्चा सातत्याने होत असते. मात्र, विनोदाला रंगभूमीवर पुन्हा स्थान मिळवून देण्यासाठी, प्रेक्षकांना हसवणं किती कठीण असतं हे समाजवून देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमधील कलागुणांना मंच देण्याच्या उद्देशाने विनोदोत्तम राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा १८ ते २१ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून पुणेकर नाटय़प्रेमींना विनोदी एकांकिकांची मेजवानी मिळणार आहे.

दादा कोंडके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थापन झालेल्या वनकिड फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. यंदा या स्पर्धेचं अकरावं वर्ष आहे. केवळ विनोदी एकांकिकांचा समावेश असलेली विनोदोत्तम करंडक ही महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा आहे. ही स्पर्धा भरत नाटय़ मंदिर येथे होणार आहे. स्पर्धेचे पारितोषिक वितरण २१ सप्टेंबर राजी सायंकाळी सहा वाजता होईल. स्पर्धेतील विजेत्या संघाला दादा कोंडके मेमोरियल फाउंडेशन पुरस्कार, दहा हजार रुपये, करंडक आणि स्मृतिचिन्ह या स्वरूपात पारितोषिक देण्यात येते. द्वितीय क्रमांक मिळालेल्या संघाला सात हजार रुपये, करंडक आणि स्मृतिचिन्ह, तृतीय क्रमांक मिळवलेल्या संघाला पाच हजार रुपये, करंडक आणि स्मृतिचिन्ह असे पारितोषिक देण्यात येणार आहे. मुंबई, नाशिक, पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणचे संघ स्पर्धेत सहभागी होतात. त्याशिवाय अभिनय, लेखन, दिग्दर्शन अशी वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ५ सप्टेंबर आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव हेमंत नगरकर यांनी दिली.

‘महाराष्ट्राला असलेली उत्तम विनोदाची परंपरा पुढे सुरू राहण्यासाठी अशा स्पर्धेची गरज होतीच. गेल्या दहा वर्षांत एकांकिका क्षेत्रात विनोदोत्तम करंडक स्पर्धेने स्वत:चे असे स्थान निर्माण केले आहे. दरवर्षी या स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद वाढतोच आहे. निखळ विनोद हेच या स्पर्धेचे सूत्र आहे. या स्पर्धेतील एकांकिकांतून वेगवेगळ्या प्रकारचा विनोद अनुभवायला मिळतो. एक वेगळं वातावरण ही स्पर्धा निर्माण करते. या स्पर्धेतून अनेक लेखक, अभिनेते, दिग्दर्शक पुढे आले आहेत.

या स्पर्धेच्या माध्यमातून उत्तम विनोदाची चळवळ पुढे सुरू राहील ही अपेक्षा आहे,’ असेही नगरकर यांनी सांगितले. स्पर्धेच्या नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी संपर्क :  ९८५०९१४८१०