News Flash

‘सुपर ३०’चे रिअल हिरो आनंद कुमार यांना ब्रेन ट्युमर

आनंद कुमार यांच्या ब्रेन ट्युमरचं जरी ऑपरेशन केलं तरी त्यात खूप अडचणी असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केल्याचं त्यांनी सांगितलं.

आनंद कुमार, हृतिक रोशन

कोणताही आधार नसलेली मुलंसुद्धा देशातील बुद्धिमान व्यक्तिमत्त्वांपैकी एक होऊ शकतात हे सिद्ध करण्यासाठी झटणाऱ्या आनंद कुमार यांचा जीवनप्रवास लवकरच चित्रपटात दिसणार आहे. ‘सुपर ३०’ हा आगामी चित्रपट आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटासंदर्भात दिलेल्या एका मुलाखतीत आनंद कुमार यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. ब्रेन ट्युमर या आजाराने ग्रस्त असल्याचं त्यांनी या मुलाखतीत सांगितलं आहे.

‘उजव्या कानाने ऐकण्यात काही समस्या जाणवल्याने मी डॉक्टरांकडे गेलो. काही चाचण्या केल्यानंतर हे समजलं की माझ्या उजव्या कानाची श्रवणक्षमता ८० ते ९० टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यानंतर २०१४ मध्ये जेव्हा मी दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात गेलो तेव्हा तिथल्या डॉक्टरांनी मला सांगितलं की माझ्या उजव्या कानाचा काही त्रास नाही. पण त्या कानाची नस मेंदूपर्यंत जिथे जाते तिथे ट्युमर आहे,’ असं ते ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

आनंद कुमार यांच्या ब्रेन ट्युमरचं जरी ऑपरेशन केलं तरी त्यात खूप अडचणी असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळे त्यांच्या डोळ्यांनाही हानी पोहोचू शकते. आनंद कुमार यांना ब्रेन ट्युमर असल्याची माहिती फक्त २०१४ च्या बॅचमधील ‘सुपर ३०’ विद्यार्थ्यांना होती.

ब्रेन ट्युमरशी झुंज देत आनंद कुमार त्यांचं सामाजिक कार्य सातत्याने करत आहेत. आनंद कुमार हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असून त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी ‘सुपर ३०’ या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटात हृतिक रोशन आनंद कुमार यांची भूमिका साकारत असून येत्या १२ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2019 6:38 pm

Web Title: super 30 anand kumar reveals that he has a brain tumour ssv 92
Next Stories
1 नेटकऱ्याच्या त्या ट्विटविरोधात स्वराची मुंबई पोलिसांकडे धाव
2 अक्षय कुमार, प्रभास, जॉनला गणेश गायतोंडेचं आव्हान
3 Sacred Games 2: काय असणार गायतोंडेच्या तिसऱ्या बापाचे रहस्य?
Just Now!
X