अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचं गूढ अद्याप उकललं नाही. त्याच्याविषयी दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. जेवढं डोळ्यांना दिसतंय तेवढं साधं हे प्रकरण नाही असं म्हणत अभिनेता शेखर सुमन यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी मोहीम हाती घेतली आहे. मंगळवारी पत्रकार परिषदेत शेखर सुमन यांनी सुशांतविषयी काही धक्कादायक माहिती सांगितली.

“सुशांतच्या घरात सुसाइड नोट मिळाली नाही, घराची बनावट चावीसुद्धा सापडत नाहीये आणि त्याने महिन्याभरात ५० वेळा सिमकार्ड्स बदलले होते. त्यामुळे सुशांतची आत्महत्या हे काही साधंसोपं प्रकरण नाही असं मला वाटतं”, असं ते पत्रकार परिषदेत म्हणाले. सुशांतने जरी आत्महत्या केली तरी त्याच्या आत्महत्येमागे दोषी असलेल्यांना शोधून काढावं आणि सुशांतला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरून वाद निर्माण झाला. या वादावर बोलताना ते पुढे म्हणाले, “शाहरुख खान आणि माझ्याशिवाय सुशांतच असा व्यक्ती होता ज्याने टीव्हीपासून सुरुवात केली आणि मोठ्या पडद्यावर यश मिळवलं. बड्या कलाकारांच्या अहंकाराकडे सुशांतने कधीच लक्ष दिलं नव्हतं. अनेकांच्या डोळ्यांत ही गोष्ट खुपली असेल.”

पुराव्याशिवाय कोणावरही आरोप करणं चुकीचं आहे असं म्हणत शेखर सुमन यांनी कोणाचीही नावं न घेता सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.