चार वर्षाच्या लहान मुलाला शिवी दिल्यामुळे गेल्या काही दिवसापासून अभिनेत्री स्वरा भास्कर चर्चेत आली आहे. एका मुलाखतीदरम्यान स्वराने शिवी दिल्याची कबुली दिली होती. या लहान मुलाने स्वराला आंटी संबोधलं होतं त्यामुळे तिने या मुलाला शिवी दिल्याचं सांगितलं होतं. मात्र घटनेनंतर तिच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. इतकंच नाही तर तिच्याविरोधात ‘बाल हक्क संरक्षण राष्ट्रीय आयोग'(एनसीपीसीआर) मध्ये तक्रार दाखल करण्यात आली.त्यानंतर आता स्वराने पहिल्यांदाच मौन सोडलं असून याविषयी स्पष्टीकरण दिलं आहे.

“ज्या कार्यक्रमामध्ये हा प्रकार घडला तो कार्यक्रम मुळातच एक कॉमेडी शो होता. जर तुम्ही तो कार्यक्रम पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की मी त्या मुलाला मदतच केली होती. त्यावेळी सेटवर काही गोष्टींची सुविधा नव्हती. अशातच या लहान मुलाला लघुशंकेसाठी जायचं होतं त्यामुळे त्याला मीच घेऊन गेले होते. मी त्याला एकप्रकारे मदतच केली होती. आतापर्यंत मी कोणत्याही लहान मुलाला किंवा सेटवरील कोणत्याही व्यक्तीला शिवीगाळ केलेला नाही. मी प्रत्येकासोबत प्रेमाने आणि आदरानेच वागते आणि यामध्ये राहता राहिला त्या लहान मुलाला शिवी देण्याचा प्रकार तर ती मी मजेमध्ये दिली होती. विनोदबुद्धीचे लोक कायम अशा मज्जा करतच असतात”, असं स्वराने सांगितलं.

वाचा : देशातील सर्वाधिक फी घेणारे विनोदी कलाकार

पुढे ती म्हणते, “हा मुद्दा प्रमाणापेक्षा जास्त गाजवला जात आहे. मला टार्गेट करण्यासाठी हे मुद्दाम करण्यात येत आहे. शिवीगाळ करण्याचं मी समर्थन करत नाही. मात्र त्यावेळी मी मस्करीच्या मूडमध्ये होते आणि त्यामुळेच मी मजेत ही शिवी दिली होती. परंतु त्यातून चुकीचा अर्थ काढण्यात आला”.

दरम्यान, ‘सन ऑफ अबिश’ नावाच्या एका शोमध्ये स्वरा भास्करला गप्पा मारण्यासाठी बोलावण्यात आले होते. या कार्यक्रमात सूत्रसंचालकाने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात कशी झाली? याबाबत एक प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना तिने हा अवाक् करणारा किस्सा सांगितला.