बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री करिना कपूर-खानचा लाडका लेक तैमुर जन्माला आल्यापासून स्टारडम उपभोगत आहे. आपल्या सेलिब्रेटी आई-वडीलांप्रमाणेच तोदेखील चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. त्यामुळे त्याची एक झलक दिसावी यासाठी चाहते प्रयत्न करत असतात. लहान असल्यापासून प्रसिद्धीची आणि कॅमेराची सवय झालेल्या तैमुरचा एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या फोटोमध्ये तैमुरने घातलेल्या टी -शर्टवर वडील सैफ अली खानसाठी एक सुंदर मेसेज दिल्याचं पाहायला मिळत आहे.
मुलाच्या किंवा मुलीच्या आयुष्यात त्यांचे बाबा हे पहिले हिरो,सुपरस्टार असतात. तसंच तैमुरसाठीदेखील त्याचे बाबा म्हणजेच सैफ अली खान हे रिअल हिरो आहेत. याचा प्रत्यय नुकत्याच एका कार्यक्रमात आला आहे.
काही दिवसापूर्वी तैमुरने आई करिनासोबत एमटीव्ही स्प्लिट्सव्हिलाचे होस्ट आणि रोडीज सीजन १ चा विजेता रणविजय सिंहच्या मुलाच्या वाढदिवसाला हजेरी लावली होती. यावेळी तैमुरने घातलेल्या कपड्यांची सर्वाधिक चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. तैमुरने घातलेल्या टी- शर्टवर ‘माय डॅड इज किंग’ असं लिहीलं असून त्यावर सिम्बाचं चित्र आहे. त्यामुळे तैमुरसाठी त्याचे बाबा खास असून त्यांने त्यांच्यासाठीच हा टी -शर्ट घेण्याचा अट्टाहास केला असावा अशी चर्चा रंगली आहे.
दरम्यान, तैमुरची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून तो सैफ-करिनापेक्षाही अधिक लोकप्रिय ठरत आहे. त्याच्या याच लोकप्रियतेमुळे काही दिवसांपूर्वी त्याच्यासारखी दिसणारी खेळणीही बाजारात आली होती.