News Flash

स्वत:शीच संवाद साधण्याचा अनुभव देणारा ‘हायवे’

'हायवे एक सेल्फी आरपार' अशी आपल्या चित्रपटाची ओळख दिग्दर्शक उमेश कुलकर्णी आणि लेखक-अभिनेता गिरीश कुलकर्णी यांनी करून दिली आहे.

| July 19, 2015 02:16 am

‘हायवे एक सेल्फी आरपार’ अशी आपल्या चित्रपटाची ओळख दिग्दर्शक उमेश कुलकर्णी आणि लेखक-अभिनेता गिरीश कुलकर्णी यांनी करून दिली आहे. मुंबई-पुण्याहून वेगवेगळ्या वाहनांनी निघालेली माणसं, माणूस त्या वाहनात बसतो तसा दिग्दर्शकाचा कॅमेराही त्याच्यामागोमाग गाडीत शिरतो आणि त्या बसलेल्या माणसाचा वेध घेऊ लागतो. संपूर्ण गाडीतल्या त्या प्रवासात कॅ मेरा समोरच्या चेहऱ्यावरचं सगळं काही टिपत असतो आणि त्या कॅ मेऱ्यातून आपणही तोच चेहरा पारखत असतो. एका क्षणाला त्याचं भावविश्व टिपता-टिपता ‘अरे! हा आपलाच चेहरा आहे’, याची जाणीव आपल्याला म्हणजे प्रेक्षकाला होते आणि ‘हायवे’वरचा तो प्रवास आपला होऊन जातो. आपले हायवेवरचे सहप्रवाशी रेणुका शहाणे, छाया कदम, किशोर चौगुले आणि निर्माता विनय गानू यांना ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात घेऊन आलेल्या गिरीश कुलकर्णीनी ‘हायवे’ या चित्रपटामागचा विचार, त्याची प्रेक्षकांना जोडून घेण्याची प्रक्रिया ही अशी वेगळी असल्याचं समजावून सांगितलं.
काही वेगळं मांडण्याचा प्रयत्न..
रेणुका शहाणे
वेगवेगळ्या प्रकारच्या दहा गाडय़ांमधील प्रवास व त्यातील प्रवासी यांचे चित्रण असलेला आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील संप्रू्ण प्रवासाचं चित्रीकरण असलेला ‘हाय वे’ हा मला वाटतं पहिलाच चित्रपट असावा. या चित्रपटाचं पूर्ण चित्रीकरण हे या महामार्गावर करण्यात आलं असून एक वेगळ्या प्रकारचा थरारक अनुभव या चित्रपटामुळे मला मिळाला. गिरीश कुलकर्णीबरोबर काम करण्याची इच्छा होती तीही यानिमित्ताने पूर्ण झाली.
गेल्या काही वर्षांपासून मराठीत वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट तयार होत असून त्याला प्रेक्षकांकडूनही खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे आम्हा कलाकारांनाही अशा चित्रपटांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करण्याची संधी मिळते आहे. मराठी प्रेक्षक हा जाणकार आणि सुजाण आहे. त्यामुळे, मराठीत नेहमीच चित्रपटाच्या आशयाला महत्त्व दिलेलं असतं. विषय हा चित्रपटाचा मुख्य गाभा किंवा राजा असतो. मराठीत युवा दिग्दर्शकांची एक नवी पिढी समोर येते आहे. ते सातत्याने नवनवीन प्रयोग करत आहेत. मराठी चित्रपटांसाठी हे खूप छान आणि उत्साहवर्धक आहे. एक अभिनेत्री आणि भावी दिग्दर्शिका म्हणूनही मला याचा अभिमान आणि कौतुक वाटतं.
परिनिरीक्षण मंडळाचा अजब कारभार
चित्रपट परिनिरीक्षण मंडळावर असलेली माणसं कशी आहेत, त्यावर बऱ्याचदा चित्रपटांचं भवितव्य ठरतं. म्हणजे काही हिंदी चित्रपटांमधून टोकाची हिंसा दाखविली जाते तरी त्याला सर्रास ‘यू’ प्रमाणपत्र मिळतं. मात्र, एखाद्या चित्रपटात प्रेमाचा किंवा प्रणयाचा प्रसंग आला तर त्याला लगेच ‘ए’ प्रमाणपत्र दिलं जातं. म्हणजे हिंसा दाखवली तर लोकांच्या मनावर काही विपरीत परिणाम होणार नाही आणि प्रणय दाखवला तर ती बिघडतील, याला काय अर्थ आहे? चित्रपटांच्या बाबतीत ही बंधनं तर तिथे दूरचित्रवाहिन्यांवर जे काही चालतं त्याबद्दल तर बोलायलाच नको; पण घराघरांत पोहोचलेल्या या माध्यमावर नियंत्रण ठेवणारं मात्र कोणी नाही, हा किती मोठा विरोधाभास आहे. जरा कोणी काही वेगळं मांडण्याचा प्रयत्न केला तर ते मात्र परिनिरीक्षण मंडळाला चालत नाही, असा अजब कारभार सुरू आहे.
‘सुरभी’सारखा आपल्याच संस्कृतीची ओळख करून देणारा शोच नाही
‘सुरभी’सारखा कार्यक्रम आता सध्या कोणत्याच दूरचित्रवाहिन्यांवर नाही. माझ्या मुलांना आपला देश काय आणि कसा आहे हे समजावून सांगण्यासाठी, शिकविण्यासाठी अशा प्रकारचा कुठलाच कार्यक्रम नाही, याची पालक आणि प्रेक्षक म्हणून खंत वाटते. म्हणजे आता वेगवेगळे शो आहेत. मात्र, एकाच शोमध्ये या वेगळ्या गोष्टी मांडणारा असा कार्यक्रम नाही. खरं म्हणजे ‘सुरभी’सारखा शो आता वाहिन्यांकडून मान्य केला जाईल की नाही याबद्दलही शंकाच वाटते. सिद्धार्थ काक यांनी अशा प्रकारचा एक वेगळा शो करायचा प्रयत्न केला होता, मात्र त्यात त्यांना यश आले नाही; पण, तरीही त्यांनी पुन्हा ‘सुरभी’ करायची तयारी दाखवली तर मलाही पुन्हा एकदा त्यात सहभागी व्हायला नक्कीच आवडेल.
हा तर रोजच्या जगण्याचा अनुभव
गिरीश कुलकर्णी –
‘देऊळ’नंतर मनात एक गोष्ट आकाराला येत होती. ‘हायवे’मधून मी रोजच्या जगण्याचा आणि मनात जे साचलं होतं, त्याला वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात वेगवेगळ्या स्वभावांची अनेक माणसं भेटत असतात. गेल्या काही वर्षांत आपल्या सगळ्यांचंच आयुष्य खूप बदलून गेलं आहे. आपल्यातील या बदलाचा, आजच्या वास्तवाचा आणि जगण्याचा अर्थ लावून बघण्याचा आणि जे भावलं ते ‘हायवे’मध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
आपल्याला जो चित्रपट पाहायला आवडतो तसा चित्रपट इतर मंडळी करायला धजावत नाहीत. मग आपणच आपला प्रयोग करायला काय हरकत आहे? अशा विचारातून चित्रपटांकडे वळलो. आमच्या प्रत्येक चित्रपटातून आम्ही वेगळा विषय हाताळला असून तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आहे. ‘हायवे’ खरं तर हिंदीत या नावाचा चित्रपट पहिल्यांदा आला, पण केवळ चित्रपटांशी संबंधित संस्थांच्या भोंगळ कारभारामुळे एकाच नावाचे चित्रपट मराठी आणि हिंदीत येण्याची किमया साधली गेली आहे. इम्तियाज आमचा चांगला मित्र आहे. त्याची चित्रपटाची संकल्पना वेगळी होती. त्यामुळे केवळ नावातला सारखेपणा सोडला तर दोन्ही चित्रपटांमध्ये कुठेही, कसलंही साधम्र्य नाही. त्यामुळे, उगाचच त्याची अडवणूक करण्यात आम्हाला रस नव्हता आणि त्याचा चित्रपट याआधीच येऊन गेलेला असल्याने या चित्रपटाला काही फरक पडणार नाही.
‘हायवे’चा एकूणच अनुभव मजेशीर होता. संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरच करण्यात आले आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणींपासून अनेक समस्यांना आम्हाला सामोरं जावं लागलं. म्हणजे चित्रीकरणाच्या दृष्टीनेही हा एक वेगळा प्रयोग होता. खरोखरच, गाडीतील कलाकाराबरोबर कॅ मेराही आतमध्ये शिरायचा. मात्र, दिग्दर्शकाला गाडीत बसताच यायचं नाही. त्यामुळे, दिग्दर्शकाला बरोबर न घेताच आमचं बरंचसं चित्रीकरण पार पडलं आहे. कित्येकदा तो दुसऱ्या गाडीत बसून सूचना द्यायचा; पण त्याला काय चित्रीकरण चाललं आहे हे पाहताच यायचं नाही. केवळ आमच्या आवाजावरून दृश्याचा वेध घ्यावा लागायचा. चित्रीकरणाआधी बऱ्याचदा आम्ही गाडीसारखी जागा रेखाटून कुठे कॅ मेरा लागेल, कलाकाराचा चेहरा कुठे असेल, अशी सगळी तालीम करून मग प्रत्यक्ष चित्रीकरण करत होतो. या चित्रपटाचा साऊंड हाही एक वेगळा प्रयत्न आहे. आणखी एक प्रयोग आम्ही केला, तो म्हणजे गाडीत कसलेल्या कलाकाराबरोबर अभिनयाशी काहीही संबंध नसलेली खरी माणसंही आम्ही बसवली आहेत. त्यामुळे यांच्या सफाईदार प्रतिक्रिया आणि इतर माणसांच्या सहज प्रतिक्रिया अशी एक अनोखी केमिस्ट्री यात लोकांना अनुभवता येईल. ‘हायवे’सारख्या चित्रपटासाठी संगीताचाही एक वेगळा बाज असावा लागतो. अमित त्रिवेदीचं हळुवार संगीत, त्याच्या संगीताचा लहेजा वेगळा आहे त्याचाही चित्रपटावर चांगला परिणाम झाला आहे.
आत्तापर्यंत लेखक-दिग्दर्शक म्हणून आम्ही दोघांनी जे चित्रपट केले त्यात ‘वळू’मध्ये पूर्णपणे ग्रामीण समाज दाखवला होता. ‘देऊळ’मध्ये शहरीकरण झालेला आणि बदलाकडे वाटचाल करणारा समाज पाहायला मिळतो, तर ‘हायवे’मध्ये सध्याचा संभ्रमित अवस्थेत असलेला समाज पाहायला मिळेल.
‘ माझ्यासाठी ही उत्तम संधी
– विनय गानू, निर्माता
‘अनुमती’, ‘पोस्टकार्ड’ आदी वेगळ्या विषयांवरील चित्रपट केले. आता ‘हायवे’च्या निमित्ताने आणखी एक वेगळा विषय प्रेक्षकांसमोर आम्ही घेऊन आलो आहोत. ‘हायवे’सारखा चित्रपट म्हणजे माझ्यातल्या निर्मात्यासाठी एक चांगली संधी आहे.
‘ वास्तवादी चित्रपट करायला आवडतात – छाया कदम, अभिनेत्री
‘फँ ड्री’सारखा संपूर्ण वास्तवाला भिडणारा चित्रपट मला पहिल्यांदा करायला मिळाला. त्यानंतर लगेचच आता ‘हायवे’सारखा पूर्ण वेगळा चित्रपट मी केला आहे. या चित्रपटाची मांडणी म्हणजे एकाच थाळीत गुलाबजाम, जिलेबी, पिठलं, पोळी असं वेगवेगळ्या चवीचं मिळावं तसं आहे. चित्रपट करताना आम्हाला केवळ आमचे प्रसंगानुरूप संवाद देण्यात आले होते. आमच्या गाडीबरोबर ज्या दुसऱ्या गाडीचं चित्रीकरण केलं जातंय त्यात कोणते कलाकार आहेत, त्यांची कथा काय याबद्दल काहीच माहिती आतापर्यंत देण्यात आली नव्हती. त्यामुळे आम्ही सगळे कलाकारही एकत्र भेटलेलो नाहीत. खूप वेगळा अनुभव एक कलाकार म्हणून या चित्रपटाने दिला आहे.
‘ असे चित्रपट समाधानासाठी करतो – किशोर चौगुले
अन्य चित्रपटात काम करताना मी पोटाचा अर्थात पैशाचा विचार करतो, तर ‘हायवे’सारख्या वेगळ्या विषयावरील चित्रपटात काम करताना माझ्या डोळ्यासमोर त्या विषयाविषयी वाटणारी जवळीक आणि समाधान हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे अगदी वेळात वेळ काढून मी असे चित्रपट आवर्जून करतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2015 2:16 am

Web Title: talk with high way team
टॅग : Loksatta
Next Stories
1 व्हिलनने संधींचा खजिना खुला केला
2 बुरखाधारी सलमान!
3 मालिकेच्या नभांगणात ‘लोकांकिका’चे तारे!
Just Now!
X