तामिळ अभिनेते विवेक यांचं चेन्नईमध्ये निधन झालं. वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. १६ एप्रिलला विवेक यांना हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांना चेन्नईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ICU मध्ये त्यांना डाक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. आज सकाळी ४ वाजुन ४५ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.

15 एप्रिलला विवेक यांनी करोना लसीचा पहिला डोस घेतला होता. लस घेतल्याची माहिती त्यांनी मीडियाला दिली होती. यासाठी त्यांनी सरकारी रुग्णालयाची निवड केली. सरकारी रुग्णालयात लस घेण्यामागचं कारण त्यांनी सांगितलं होतं. ” कोव्हिड लस सुरक्षित आहे. पण आपण लस घेतली आहे म्हणजे आपण आजारी नाही होणार असं समजू नका. काळजी आपल्याला घ्यावीच लागेल. लस घेतल्यामुळे फक्त आधीपेक्षा धोका कमी झालाय हे निश्चित होईल.” असं मीडियाशई बोलताना ते म्हणाले होते.

विवेक यांच्या निधनाच्या बातमीनंतर तामिळ सिनेसृष्टीतील अनेकांनी सोशल मीडियावरुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री एडप्पाडी के पलानीस्वामी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत शोक व्यक्त केलाय. 

विवेक यांनी अनेक तामिळ सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. ते एक उत्तम कॉमेडीयन होते. रजनीकांत, कमल हासन, अजित, विजय, माधवन  यांसारख्या बड्या कलाकारांसोबत त्यांनी काम केलं आहे. सिनेमातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं होतं.