दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांच्या मुलाचा रामचरण यांचा आगामी ‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०० कोटींचं बजेट असलेला हा चित्रपट तेलुगु, हिंदी, तामिळ आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून यात कलाविश्वातील दिग्गज व्यक्तींचा समावेश असणार आहे. अनेक वेळा चित्रपट हे त्यातील कलाकारांमुळे लोकप्रिय होतात. त्यामुळे बिग बजेट चित्रपटांमध्ये सहसा अशाच लोकप्रिय कलाकारांचा भरणा करण्यात येतो हा एक समज आहे. परंतु ‘नरसिम्हा रेड्डी’मध्ये अमिताभ बच्चन, सुदीप या सारख्या कलाकारांना घेण्यामागे एक वेगळं कारण असल्याचं चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं आहे.

‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’ या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, किच्चा सुदीप, तमन्ना भाटिया यासारखे दिग्गज कलाकार मंडळी झळकणार आहेत. यात अमिताभ बच्चन ‘नरसिम्हा रेड्डी’च्या गुरुंची भूमिका साकरत असून त्यांचा हा कॅमियो रोल आहे. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन या चित्रपटात झळकणार असल्याचं समजल्यापासून या चित्रपटाविषयी अनेक चर्चांना उधाण आलं आहे. यावर चित्रपटाचे दिग्दर्शक सुरेंद्र रेड्डी यांनी त्यांचं मौन सोडलं आहे.

“लोकप्रिय कलाकारांमुळे चित्रपट चालतो असा सामान्यपणे एक समज आहे. मात्र अमिताभ बच्चन, सुदीप, विजय सेतुपती या कलाकारांची लोकप्रियता किंवा त्यांची स्टार व्ह्यॅल्यु पाहून त्यांना या चित्रपटात घेतलं नसून चित्रपटाच्या कथानकाची गरज म्हणून त्यांना घेतलं आहे”, असं चित्रपटाचे दिग्दर्शक सुरेंद्र रेड्डी यांनी सांगितलं.

आणखी वाचा : बिग बींनी ‘Selfie’ला दिले नवे हिंदी नाव

दरम्यान, हा चित्रपट कुरनूल येथे राहणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक नरसिम्हा रेड्डी यांच्या जीवनावर आधारित असून चिरंजीवी यात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तर सुदीप याने अवुकू राजू हे व्यक्तीरेखा साकारली आहे.