‘इनसेप्शन’, ‘इंटरस्टेलर’ ‘बॅटमॅन द डार्क  नाइट’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन करणारा ख्रिस्तोफर नोलान हा हॉलीवूडमधील यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक आहे. कठिणातील कठीण विषय अगदी सोप्या पद्धतीने चित्रपट माध्यमातून हाताळण्याच्या विशेष शैलीमुळे अगदी कमी कालावधीत त्याने लोकप्रियता मिळवली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘डंकर्क’ या चित्रपटातही त्याने दमदार यश मिळवलं आहे. नोलानचे यश हे नेहमीच त्याच्या चाहत्यांच्या कुतूहलाचा विषय ठरला आहे. अनेक मुलाखतींमधून त्याचे हे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु त्याने ताकास तूर लावू न देता उडवाउडवीची उत्तरे देऊन विषय टाळला. ‘डंकर्क’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीदरम्यान पुन्हा एकदा हा विषय उफाळून बाहेर आला. दरम्यान, फियोन व्हाइटहेट, हॅरी स्टाइल्स आणि टॉम हार्डी या कलाकारांनी या रहस्यावरील पडदा उघडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते नोलानची जिद्द आणि प्रामाणिकपणा हे त्याच्या यशाचे प्रमुख कारण आहे. तो खूप सर्जनशील आहे. एखाद्या समस्येवर अपेक्षित उत्तर मिळेपर्यंत तो स्वस्थ बसत नाही. चित्रीकरणादरम्यान खुर्च्या, पाण्याच्या बाटल्या, मोबाइल फोन यांना सेटवर स्थान नसते. अगदी तहान-भूक विसरून तो आपले काम करतो. बऱ्याचदा त्याच्या या वृत्तीचा सहकलाकारांना त्रास होतो, परंतु चित्रपटाने मिळवलेले यश पाहता केलेल्या मेहनतीचे चीज झाले असे वाटते. नोलानला यावर विचारले असता तो एक शिस्तप्रिय दिग्दर्शक आहे हे त्याने मान्य केले. बऱ्याचदा तो एका कडक शिक्षकाप्रमाणे कलाकारांशी वागतो. चित्रीकरणादरम्यान त्याला आवाज, गोंधळ जराही आवडत नाही. सेटवरील प्रत्येक लहान-लहान वस्तूंची नोंद त्याच्या डोक्यात असते. चित्रीकरण सुरू असताना सेल्फी काढायलाही तो परवानगी देत नाही. याचा त्रास त्याच्या सहकलाकारांना होतो याची जाण त्याला आहे, परंतु त्याच्या मते निर्माते एखाद्या चित्रपटावर प्रचंड पैसा खर्च करतात आणि आपल्या बेशिस्त वर्तनामुळे एखादा दिवस जरी वाया गेला तरी काही कोटींचे नुकसान होते. परिणामी, चित्रपट बजेटच्या बाहेर जाऊन पूर्ण होण्याआधीच त्यावर तोटय़ाचे वारे फिरू लागतात. मग निर्माते कलाकारांना मिळणाऱ्या मानधनातून ते पैसे वजा करतात. क्षुल्लक दिसणाऱ्या गोष्टींचे वाईट परिणाम होऊ शकतात. त्यामुळे तो जाणीवपूर्वक तसे वागतो. काम करताना शिस्तीची गरज असतेच असे नाही, पण शिस्तीचे पालन केले तर अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळवता येऊ शकते, ही त्याच्या वडिलांनी त्याला दिलेली शिकवण हे त्याच्या यशाचे खरे रहस्य आहे असे तो मानतो.