News Flash

बालिश करमणूक

गेल्या वर्षांत अनेक हिंदी सिनेमांचे सीक्वेल आणि रिमेक पडद्यावर आले; परंतु नेहमीच मूळ चित्रपटापेक्षा सीक्वेल किंवा रीमेक हे प्रभावी ठरू शकत नाहीत

| January 12, 2014 01:03 am

गेल्या वर्षांत अनेक हिंदी सिनेमांचे सीक्वेल आणि रिमेक पडद्यावर आले; परंतु नेहमीच मूळ चित्रपटापेक्षा सीक्वेल किंवा रीमेक हे प्रभावी ठरू शकत नाहीत असे काही अपवाद वगळता म्हणावे लागते. ‘ब्लॅक कॉमेडी थ्रिलर’ अशा प्रकारातल्या चित्रपटांचा सीक्वेल मात्र अधिक औत्सुक्य निर्माण करणारा  असतो. परंतु ‘देढ इश्कियाँ’ या बहुचर्चित चित्रपटाच्या बाबतीत मात्र कलावंतांचा अभिनय वगळता फारसे काही प्रेक्षकाला आनंद देणारे पाहायला मिळत नाही. अति शहाण्या किंवा दीड शहाण्या व्यक्तिरेखांची नावापुरतीच ‘इश्कबाजी’ असे वर्णन या चित्रपटाचे करावे लागेल. नाही म्हणायला उर्दू समजणाऱ्या प्रेक्षकांना त्यातील शेरोशायरीने थोडी गंमत आणल्याचे जाणवेल. मध्यांतरानंतर बालिश पद्धतीने व्यक्तिरेखांचा प्रवास होतो. त्यामुळे करमणूक करण्यात दिग्दर्शक अपयशी ठरतो.
दिग्दर्शकाचे यापूर्वीचे चित्रपट आशय-विषयाच्या बाबतीत पूर्णपणे वेगळे ठरल्यामुळे त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल नेहमीच उत्सुकता निर्माण होत असते. त्यात एकेकाळी रुपेरी पडद्यावर आपले सौंदर्य आणि नृत्याभिनयाने गाजलेल्या अभिनेत्रीचे पुनरागमन, तसेच अन्य दोन प्रमुख कलावंतांची अभिनय जुगलबंदी असे सारे काही पाहायला मिळणार म्हणून प्रेक्षक चित्रपटगृहात गेला तर फारसे काही त्याच्या हाती लागणार नाही.
मूळ चित्रपटातील खालूजान आणि बब्बन या दोन चोरांच्या व्यक्तिरेखा कायम ठेवत काळ, पाश्र्वभूमी, घटना-प्रसंग यांमध्ये संपूर्णपणे नव्याने मांडणारा हा सीक्वेल आहे. गावरान, देशी स्वरूपाचे प्रेम व्यक्त करणाऱ्या नायक-नायिकेच्या व्यक्तिरेखा हे या चित्रपटाचे खरे तर वैशिष्टय़; परंतु या सीक्वेलमध्ये त्याचा अभाव आहे.
बेगम पारा ही एका नवाबाची विधवा. तिच्या नवऱ्याने म्हणे मरतानाच तिला पुनर्विवाह करण्याचा सल्ला दिला. बरं एवढा सल्ला देऊन तो थांबला नाही तर एखाद्या सुफी शायरी जाणकार किंवा कवीसोबतच लग्न करण्याची इच्छा प्रदर्शित केली म्हणे. मग काय नवाबाची बेगम गेल्या तीन वर्षांपासून आपल्या या कैलासवासी नवाबाच्या इच्छेखातर मुशायरांचे आयोजन करून एखादा कविमनाचा नवरा शोधण्याची खटपट करते. याचा सुगावा खालुजान ऊर्फ इफ्तिकारला लागतो आणि श्रीमंत बनण्याची आणि विलासी जीवन जगण्याची इच्छा पूर्ण करता यावी म्हणून खोटा नवाब बनून तो महमूदाबादच्या नवाबाच्या आलिशान वाडय़ात दाखल होतो. त्यामुळे आपोआपच टीव्हीच्या माध्यमातून बब्बनला खालुजानचा ठावठिकाणा समजतो आणि तोही तिथे दाखल होतो. बेगम पारा-खालुजान, बेगम पाराची ‘सहेली’, ‘सखी’, ‘मदतनीस’ असलेली मुनिया आणि बब्बन यांच्यात प्रेम जुळते. आपणच या महमूदाबादचे नवाब बनणार असे मनोमन पटलेल्या खालुजानला महमूदाबादच्या नवाबाची सूत्रे जान मोहम्मद या स्थानिक आमदाराकडे जाते तेव्हा अतीव दु:ख होते. वस्तुस्थिती एकदम निराळी असल्याची जाणीव खालुजान-बब्बन दोघांना होते तेव्हा वेळ निघून गेलेली असते.
लेखक-दिग्दर्शकांनी काळ आजचा दाखविला आहे. महमूदाबाद या लखनौजवळ कुठेतरी असलेल्या एका नवाबाच्या संस्थानामध्ये सगळे कथानक घडते. मूळ चित्रपटातील बब्बन व खालुजान यांना अडचणीत आणणारे आणि त्यातून मार्ग काढण्याचे त्यांचे कसब दाखविणारे प्रसंग सीक्वेलमधील असतील आणि ते दोघे धमाल करतील अशी अपेक्षा घेऊन प्रेक्षक चित्रपटगृहात जातो; परंतु आजच्या काळात वावरणारी बेगम पारा व तिची सहकारी मुनिया, मध्यांतरांपर्यंत नवाबी संस्कृती, शेरोशायरी यावर चित्रपटाचा भर आहे. तर मध्यांतरानंतर चित्रपट एकदम भलत्याच वळणावर नेऊन ठेवला आहे. बेगम पारा-खालुजान यांची जुनी ओळख आहे हे दाखविताना भूतकाळातील तिच्या नृत्याची दृश्ये दाखवली आहेत. परंतु, त्यामुळे प्रेक्षकाचा गोंधळ उडाल्यावाचून राहत नाही. बब्बन-खालुजान ज्या गुंडासाठी चोरीमारी करीत असतात त्याचा पहिला व शेवटचा प्रसंग दाखवून चित्रपट लांबवला आहे.
बेगम पाराचे ‘स्वयंवर’ मध्यांतरापर्यंत आणि नंतर तिचे अपहरण, खलनायकापासून सुटका करून डाव उलटविण्याचा प्रयत्न आणि भलभलत्या हास्यास्पद व्यक्तिरेखांसोबत खालुजान-बब्बन यांची पिस्तुलबाजी असा सगळा प्रकार दाखवून उपहासात्मक विनोद आणि म्हणे त्यातला थरार दिग्दर्शकाला दाखवायचा आहे. मुनिया येते कुठून, तिची पाश्र्वभूमी काय, तिचे नायिकेशी नाते कसे तयार होते. एकीकडे ती बेगम पाराच्या हत्येची सुपारी देताना दाखविले आहे. बेगम पारा मात्र तिला मैत्रीण मानते. बेगम पाराचा मर्त्य नवाब तिच्यावर प्रेम करत नव्हता हे अधोरेखित करणारे संवाद बेगम पारा म्हणते; परंतु तरीसुद्धा त्याची इच्छा म्हणून एका शायरशी तिला लग्न करायचे आहे असे सांगते हे सारेच अनाकलनीय वाटते. बेगडे कथानक, तेवढय़ाच तकलादू प्रसंगांची पखरण आणि त्यातून म्हणे उपहासात्मक विनोद थरारकपणे दाखवायचा दावा सगळे फोल ठरते. माधुरी दीक्षितच्या ऐवजी दुसऱ्या कुणीही बेगम पारा साकारली असती तरी काही फरक पडला नसता असे मात्र निश्चितच वाटून जाते. अर्थात माधुरी दीक्षितचे पुनरागमन असल्यामुळे तिच्या नृत्याभिनयाने नटलेले गाणे, त्याचे चित्रीकरण नेत्रसुखद ठरते इतकेच. सर्वसामान्य रसिकांना गृहीत धरण्याचा प्रकार चित्रपटकर्त्यांनी केल्यामुळे प्रेक्षकाला त्यातील बालिशपणा मात्र हास्यास्पद वाटतो.  
डेढ इश्कियाँ
निर्माते- रामन मारू, विशाल भारद्वाज
दिग्दर्शक- अभिषेक चौबे
कथा- दाराब फारूकी
पटकथा- अभिषेक चौबे, विशाल भारद्वाज, गुलजार
संवाद- विशाल भारद्वाज
संगीत- विशाल भारद्वाज
छायालेखन- सेतू
कलावंत- माधुरी दीक्षित, नासिरुद्दीन शाह, अर्शद वारसी, हुमा कुरेशी, विजय राज, मनोज पाहवा, रवी गोसायन व अन्य.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2014 1:03 am

Web Title: the tongue in cheek dedh ishqiya review
Next Stories
1 प्रामाणिक स्तुत्य प्रयत्न तरीही..
2 माणूसपणाची पताका उंचावणारे ‘द लोअर डेप्थस्’
3 हॅपी बर्थडे हृतिक! : जाणून घ्या हृतिकबद्दलच्या दहा गोष्टी
Just Now!
X