‘टायटॅनिक’च्या शोकांतिकेला आज शंभर वर्षांहून अधिक काळ लोटून गेला आहे. १९९७ साली याच घटनेवरून तयार करण्यात आलेल्या ‘टायटॅनिक’ या चित्रपटाला यंदा वीस र्वष पूर्ण होत आहेत. या चित्रपटाने ७० व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात तब्बल १० पुरस्कारांवर आपले नाव कोरले होते. याचे औचित्य साधत दिग्दर्शक जेम्स कॅमरून यांनी या चित्रपटाला पुन्हा एकदा अद्ययावत तंत्रज्ञानासह प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

१ ते ७ डिसेंबर २०१७ दरम्यान अमेरिकेतील ‘एएमआर सिनेमागृहा’त हा चित्रपट दाखवला जाणार आहे. ज्या प्रेक्षकांना अमेरिकेत जाऊन सिनेमाचा आस्वाद घेणे शक्य होणार नाही त्यांना इंटरनेटच्या माध्यमातून या सुधारित आवृत्तीचा आनंद घेता येणार आहे. सध्या या नव्या सुधारित ‘टायटॅनिक’चा ट्रेलर यूटय़ूबवर धुमाकूळ घालत असून ४ लाख ८८ हजार ९८२ पेक्षा जास्त प्रेक्षकांनी त्याची नोंद घेतली आहे.

या चित्रपटाच्या जुन्या प्रिंटमध्ये नेमकी काय सुधारणा केली आहे? हे पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. दिग्दर्शक जेम्स कॅमरून यांच्या मते कथेला किंवा त्यातील महत्त्वाच्या दृष्यांना जराही कात्री न लावता त्यांनी केवळ तांत्रिक सुधारणा केली आहे. यातील शेवटचा भाग म्हणजे जहाज बुडते त्या दृष्यात चित्रपटाचा खरा आत्मा आहे. त्यामुळे त्या क्षणांना आणखी जिवंत करण्यासाठी त्यातील लहान लहान बारकावे टिपून त्यांचे ‘अल्ट्रा एचडी ग्राफीक’चा वापर करत पुन:चित्रीकरण करण्यात आले आहे. तंत्रज्ञानाची ही अफलातून करामत पाहण्यासाठी ‘टायटॅनिक’ हा चित्रपट पुन्हा एकदा पाहावाच अशी विनंतीही कॅमरून यांनी प्रेक्षकांना केली आहे.