बॉलिवूड अभिनेता म्हटलं की त्याचे जगभरात चाहते असणारच. मग याला वरुण धवन तरी कसा अपवाद असेल. उत्तम नृत्य आणि अभिनय याच्या जोरावर त्याने आपला वेगळा चाहता वर्गही बनवला आहे. तो आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच जोडलेला असतो. त्याचे आगामी सिनेमे, जाहिराती, प्रोजेक्ट या सगळ्याची तो माहिती आपल्या चाहत्यांना देत असतो. फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर वरुणचे लाखो चाहते आहेत. पण नुकताच वरुणने ट्विटरवर फार सक्रिय न राहण्याचा निर्णय घेतला आहे. पुढचे काही दिवस तरी तो ट्विटरवर दिसणार नाही. वरुणच्या या निर्णयामुळे त्याचे चाहते नक्कीच निराश झाले असतील.
‘मी ट्विटरवरुन काही काळासाठी दूर जात आहे. पण मी काही कायमचंच ट्विटर बंद करत नाहीये. मी लवकरच परत येईन, असा मेसेज वरुणने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर करत दिला.’ वरुणने शेवटचे ट्विट ३ एप्रिलला केले होते. ‘मैं तेरा हिरो’ या सिनेमाच्या सेटवरचा एक फोटो त्याने शेअर केला होता. ‘मैं तेरा हिरो’ला तीन वर्षे पूर्ण झाल्याचे सांगत या सिनेमाने माझं आयुष्य बदललं,’ असं तो म्हणाला.
3 years of MTH. A film that changed me and my life @Ileana_Official @NargisFakhri pic.twitter.com/BpZWK4iwnH
— VarunDhawan (@Varun_dvn) April 3, 2017
वरुणचा आलिया भट्टसोबत नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ सिनेमाला प्रेक्षकांनी पसंती दिली होती. या सिनेमाने तिकीट बारीवर १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केलीय. वरुण आणि आलियाचा एकत्र केलेला हा तिसरा सिनेमा आहे. वरुण ट्विटरवरुन या सिनेमाचे पोस्टर, टीझर, व्हिडिओ अशा अनेक गोष्टी शेअर करत होता. सोशल मीडियावरुन प्रत्येक कलाकार आपल्या सिनेमांचे प्रमोशन करत असतो. पण मग अशा वेळी वरुण नेमक कोणत्या कारणासाठी ट्विटरवरुन दूर जातोय हे मात्र काही कळत नाही.
‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या सिनेमानंतर वरुण सध्या ‘जुडवा २’ च्या चित्रीकरणामध्ये मग्न आहे. या सिनेमात त्याच्यासोबत तापसी पन्नू आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या मुख्य भूमिका आहेत. डेविड धवन यांच्या दिग्दर्शनात बनणारा हा सिनेमा येत्या २९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.