गेल्या काही दिवसांपासून सोनी टीव्हीवरील रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडल १२’ चांगलाच चर्चेत आला आहे. आता या शोच्या जजेस पैकी एक म्युझिक कंपोजर आणि गायक विशाल दादलानीने इंडियन आयडल शोमध्ये पुन्हा येण्यास नकार दिला आहे. विशाल ददलानी गेल्या तीन सिझनपासून या शोमध्ये जजची भूमिका पार पाडत आहे. मात्र आता इंडियन आयडलच्या १२ व्या पर्वात पुन्हा येण्यास त्याने थेट नकार दिला आहे.
या शोमध्ये विशाल दादलानी सोबतच नेहा कक्कर आणि हिमेश रेशमिया यांचं ट्युनिंक प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस येत होतं. मात्र महाराष्ट्रात लॉकडाउन लागू करण्यात आल्यानंतर शोच्या मेकर्सनी संपूर्ण टीमसोबत दमणमध्ये शूटिंग सुरू केलं. यावेळी नेहा कक्कर आणि हिमेशसोबतच विशालने देखील दमणमध्ये शूटिंगसाठी जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे जजेस म्हणून शोमध्ये मनोज मुंतशिर आणि अनु मलिक यांना घेण्यात आलं.
अलिकडे काही एपिसोडमध्ये नेहा आणि हिमेश झळकू लागले आहेत. मात्र विशाल दादलानीने शोमध्ये परतण्यास नकार दिलाय. ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत विशालने जोपर्यंत लॉकडाउन आहे तोपर्यंत शोमध्ये परणार नाही असं स्पष्ट केलंय.
View this post on Instagram
शोचा होस्ट आदित्य नारायणने नुकत्यात ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केलं होतं. “गेल्या वर्षीच विशाल त्याच्या आई-वडिलांसह लोणावळ्यामध्ये शिफ्ट झाला आहे. लोणावळ्याहून प्रवास करत दमणला जायचं आणि पुन्हा लोणावळा असा प्रवास करण्याची विशालची इच्छा नाही. यामुळे त्याच्या पालकांसाठी करोना संक्रमणाचा धोका वाढू शकतो असं विशालला वाटतं.” असं आदित्यने या मुलाखतीत सांगितलं होतं.
एकंदरच विशाल आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी या शोमध्ये पुन्हा जाण्यास तयार नसल्याचं स्पष्ट झालंय.