बॉलिवूड चित्रपटांच्या नावांचा मुद्दा अधोरेखित करत आजवर बरेच वाद समोर आले आहेत. यातच आता सलमान खानच्या निर्मितीअंतर्गत साकारला जाणारा ‘लवरात्री’ या चित्रपटाचा वाद नव्याने समोर आला आहे. या चित्रपटाच्या नावावर विश्व हिंदू परिषदेने आक्षेप घेतला असून, त्यामध्ये हिंदू सणाच्या नावाचा उल्लेख केल्यात आल्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

सणाचा एका वेगळ्याच दृष्टीने अर्थ लागत असल्यामुळे आयुष शर्माची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाला ‘विएचपी’कडून विरोध करण्यात येत आहे. परिषदेच्या इंटरनॅशनल वर्किंग अध्यक्षपदी असणाऱ्या आलोक कुमार यांनी याविषयी आपली प्रतिक्रिया दिली. ‘देशातील कोणत्याच चित्रपटगृहात आम्ही हा चित्रपट प्रदर्शित होवू देणार नाही. या चित्रपटाच्या नावामुळे तमाम हिंदूंच्या भावना दुखावल्या जाव्यात असं आम्हाला मुळीच वाटत नाही. नवरात्रीच्या संकल्पनेवर आधारित या चित्रपटातून या सणाचा वेगळाच अर्थ प्रेक्षकांपर्यंत जात आहे’, असं ते म्हणाले.

https://www.instagram.com/p/Bi1oRYcHUQN/

वाचा : प्रिन्स हॅरी- मेगन मार्कलच्या शाही विवाहसोहळ्याचा खर्च नेमका आहे तरी किती?

विश्व हिंदू परिषदेची ही भूमिका पाहता आता येत्या काळात सलमानच्या अडचणीत आणखी वाढ होणार की, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट मोकळी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सलमानसाठी हा चित्रपट जरा जास्तच खास आहे, कारण त्याची बहिण अर्पिता खान हिचा पती आयुष शर्मा या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेची मनधरणी करण्यात सलमान आणि ‘लवरात्री’ची टीम यशस्वी होते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.