कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी पोलिसांनी एल्गार परिषदेच्या आयोजकांवर ठपका ठेवल्यानंतर माओवाद्यांचा या प्रकरणी हात असल्याचा दावा केला. त्यानंतर मंगळवारी देशभरात छापे मारून नक्षलींशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करत एल्गार परिषदेच्या आयोजकांना व संबंधित कार्यकर्त्यांना अटक केली. पोलिसांनी एकूण पाच जणांना अटक केली आहे. दरम्यान सोशल मीडियावर अटकेप्रकरणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. काहीजणांना हे मानवी अधिकारांचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे तर काहींनी कारवाईवर समाधान व्यक्त केलं.

दरम्यान बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी लोकांना शहरी नक्षलवाद्यांना समर्थन करणाऱ्यांची यादी तयार करा असं सांगत नवा वाद निर्माण केला आहे. मात्र आपण हे आवाहन कशासाठी केलं याचं स्ष्टीकरण त्यांनी दिलेलं नाही.

त्यांचं हे ट्विट अंगलट येताना दिसत असून ट्विटरवर अनेकांनी #MeTooUrbanNaxal हॅशटॅग सुरु करत उपाहासात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. #MeTooUrbanNaxal हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहे.

दरम्यान, विवेक अग्निहोत्री आपलं स्वत:चं अर्बन नक्षल या पुस्तकाचं प्रमोशन या निमित्तानं करत असल्याची टिप्पणी काही जणांनी केली आहे. तर सागरिका घोष यांनी धर्मांध चित्रपट निर्माता असं अग्निहोत्री यांचं वर्णन केलं आहे. #UrbanNaxal किंवा कथित नक्षलींवरील कारवाई वरून हिंदुत्ववादी व डावे असं युद्ध सोशल मीडियावर रंगताना बघायला मिळत आहे.