सिनेमा पाहायला रिकामा वेळ हवा, आठवड्यातून मिळणारी एक सुटी वाया का घालवू, त्यापेक्षा ऑफिसला जाताना एक व येताना एक असे दोन चित्रपट पाहिले की प्रवासही सुखाचा होतो.
हे असे चित्रपट पाहणे ही बदलत्या वेगवान काळाची गरज झाल्यावर पूर्ण लांबीचे चित्रपट ही संकल्पनाच मागे पडून लघुपट ही उद्याच्या काळाची गरज ठरेल काय, याचे उत्तर मिळेलच. पण हे असे तुकड्यात चित्रपट पाहणे अथवा प्रेक्षकांनीच संकलक होणे नवीन नाही. त्याचाही आपला रंजक प्रवास आहे. खेड्यापाड्यातील व जत्रांमधील तंबू थिएटर, टुरिंग टॉकिज, फिरता सिनेमा आणि शहरातील गल्ली चित्रपट यांतही चित्रपट कापाकापी संस्कृती केव्हाच रुजलीये. अधिकृत सेन्सॉर झालेला चित्रपट अगदी तसाच प्रदर्शित करणे, असा नियम कधीही नव्हता व आजही नाही. त्यात निर्माता वितरक व प्रदर्शक हे तीन घटक काही भाग पुन्हा कमीही करतात. रामगोपाल वर्माने पाच गाण्यासह ‘भूत’ सेन्सॉर करून घेतला पण या गाण्यांमुळे चित्रपटातील तणाव कमी होतोय वाटल्याने ती बाजूला ठेवली. पण याशिवाय चित्रपट कापण्याचे अनेक प्रकार आहेत. ‘नवरी मिळे नवर्‍या’लाच्या नागपूरमधील रौप्य महोत्सवी सोहळ्यात आपलाच हा चित्रपट पुन्हा पाहताना सचिनच्या लक्षात आले मधला दहा मिनिटाचा भागच नाही. तो तडक ऑपरेटर रुममधे जाताच त्याला मोठाच धक्का बसला. त्याला समजले पंचवीस आठवडे हा असाच चित्रपट दाखवला जातोय व प्रेक्षकही तसाच आनंद घेताहेत.

राजदत्त दिग्दर्शित ‘पुढचे पाऊल’ या चित्रपटाचे इस्लामपूरच्या थिएटरवाल्याने नावच आपल्या अधिकारात बदलले व ‘सासूबाई मला मारु नका’ असे केले. कारण काय तर ग्रामीण भागातील प्रेक्षकांना हेच नाव समजते. अर्थात नवे नाव मूळ पोस्टर वा सेन्सॉर प्रमाणपत्रावर नसते तर ठळक अक्षरात लिहिलेल्या पोस्टरवर असते. असे अनेक नवे उद्योग येथे घडतात. ऋषि कपूर व वर्षा उसगावकर यांचा ‘हनिमून’ चित्रपट गावागावात ‘सुहाग रात’ नावाने झळकला. लांबीने मोठे असणारे असे ‘बॉर्डर’, ‘लगान’, ‘गदर एक प्रेमकथा’ असे चित्रपट ग्रामीण प्रेक्षकांना कधीच पूर्ण पाहायला मिळत नाहीत हे माहितीये? मुंबईत सिंगल स्क्रीन थिएटरला अशा चित्रपटांच्या वेळा एक, पाच व रात्रौ नऊ अशा असतात. ग्रामीण भागात या वेळा गैरसोयीच्या ठरतात. तीन, सहा व नऊ अशी तेथील संस्कृती. रात्रौचा खेळ बारा वाजता संपला तरच रिक्षा मिळणार हे सगळेच जमवून आणायचे तर चित्रपट कापा. हे अगदी बेधडक व सवयीने होते. ही रुळलेली व रुजलेली पद्धत आहे. प्रेक्षकांच्या हाती हा अधिकार येऊनही ३५ वर्षे झालीत. व्हिडिओ आला तोच आपण घरबसल्या हवा तेव्हा आणि हवा तसाच चित्रपट पाहायचा ही संस्कृती घेऊन! एखादा प्रसंग वा गाणे कंटाळवाणे वाटले रे वाटले की करा फॉरवर्ड याची हात व नजर याना सवय लागली. एकेका दृश्य वा गाण्यावर दिग्दर्शकाने कसा विचार केला, त्यातूनच त्याने काय सांगितले वगैरे प्रश्नांशी या प्रेक्षकांना काहीही देणेघेणे नसते. चित्रपटातून असे काही पाहायचे असते वा चित्रपटात असे काही असते हेच ते मानत नाहीत कारण त्यांच्या दृष्टीने चित्रपट म्हणजे अनेकदा तरी फक्त टाईमपास असतो तर ‘सैराट’, ‘दंगल’च्या वेळेस दर्जेदार मनोरंजन असते. इतरही अनेक चित्रपट कमी अधिक प्रमाणात यश मिळवतात. पण चित्रपटाचे तुकडे करणेदेखील खूपच मोठी वस्तुस्थिती आहे. पूर्वी चित्रपट रिळाच्या माध्यमातून दाखवला जाई तेव्हा थिएटरवाल्याना हे ऑपरेशन सहज शक्य होई. भगवानदादांच्या ‘अलबेला’चे भोली सुरत दिल के खोटे.. तर चित्रपट संपल्यावर पुन्हा दाखवता येई. आता मोबाईलवर ‘सुल्तान’ पाहताना सलमानच्या सिक्स पॅकचे रुप पुन्हा पुन्हा पाहता येतेय. या अनोख्या खेळात चित्रपट कसा पाहावा; एखादे प्रतिकात्मक दृश्य कसे पाहावे; एखादे दृश्य पार्श्वसंगीताने कसे उठावदार झाल्याचे पाहावे, अशा अनेक गोष्टी ‘पडद्याआड’ गेल्यात. त्याचे सुख, दुःखही करणे आवश्यक वाटत नाही. पण असा देखील एक चित्रपट दाखवायचा व पाहण्याचाही मस्तच मनोरंजक प्रवास मात्र सुरु आहे. व्हिडिओ थिएटरमधे कधी गेलाय तुम्ही? तेथे काही चित्रपटांतून बायपास ऑपरेशन पाहायला मिळेल. ओशिवरा कुर्ला भागात ती आहेत. एखादा चित्रपट सुरु असतानाच वेगळीच कामुक दृश्ये पाहायला मिळतील. तुम्हाला वाटेल ही येथील चित्रपट संस्कृती आहे. काही दिवसांनी एखादा भोजपुरी चित्रपट पाहायला जा. पुन्हा तीच कामुक दृश्ये व नजरा खिळलेल्या. हे संकलन भारीच आहे ना? पण ही अशी तुकड्या तुकड्याने मिळूनच चित्रपट व प्रेक्षकांची आवडनिवड संस्कृती विकसित झालीये. त्याचा मनसोक्त मनमुराद आनंद घेतला जातोय तर त्याबाबत तक्रार काय करायची व कोणाकडे? याच अजब रसायन असणार्‍या चमत्कारिक संस्कृतीचा भाग म्हणून तुम्हीच स्वतःलाच प्रश्न कराल; अलिकडे मल्टिप्लेक्समधे जाऊन पाहिलेला चित्रपट कोणता बरे? तोही मोबाईल पूर्णपणे बंद करून पाहिलाय ना?
दिलीप ठाकूर