विश्व सुंदरी आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. १९९४ मध्ये ‘मिस वर्ल्ड’ झाल्यानंतर ऐश्वर्या घराघरात पोहोचली. त्यानंतर तिच्या करिअरला खरी सुरुवात झाली. करिअरच्या सुरुवातीच्या काळात ऐश्वर्या आणि अभिनेत्री मनीषा कोईराला यांच्यात मोठा वाद झाला होता. ऐश्वर्या आणि मनीषा मध्ये वाद हा मॉडेल राजीव मुलचंदानी वरून झाला होता.

ऐश्वर्या राजीवसोबत रिलेशनशिपमध्ये होती अशा चर्चा आधी सुरु होत्या. त्यानंतर अचानक मनीषासाठी राजीवने ऐश्वर्याला सोडले अशी चर्चा होती. ‘फिल्मिबीट’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘शोटाइम’ या मॅग्झिनच्या डिसेंबर १९९९च्या मासिकेत या सगळ्या प्रकरणावर ऐश्वर्याने बाजू मांडली होती. ऐश्वर्या म्हणाली, “११९४ साली एक मॅग्झिनमध्ये ही गोष्ट सांगण्यात आली होती. राजीवने मला मनीषासाठी सोडले होते. ही खोटी बातमी कळताच, मी राजीवला फोन केला. राजीव माझा चांगला मित्र होता. मी त्याला सांगितले की अशा कोणत्या ही प्रेमकरणाचा भाग होण्याची माझी इच्छा नाही. या सगळ्या गोष्टीनंतर, दोन महिन्यात मनीषा आणि राजीव विभक्त झाले. कारण मनीषा दर दोन महिन्यांनतर दुसऱ्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये यायची.”

पुढे ऐश्वर्या म्हणाली, “मी ‘बॉम्बे’ हा चित्रपट तामिळमध्ये पाहिला तो चित्रपट पाहताच मला अप्रतिम वाटला. मी १ एप्रिल १९९५ रोजी मुंबईला आली आणि योगायोगाने मला राजीवचा फोन आला. मी त्याला सांगतचं होते की मला ‘बॉम्बे’ चित्रपट किती आवडला आणि मनीषाचे कौतुक करण्यासाठी मी तिला एक पुष्पगुच्छ पाठवण्याचा विचार केला आहे. तेवढ्यात राजीव हसला आणि म्हणाला, ‘तू वर्तमानपत्र वाचतेस की नाही?’ त्याने मला सांगितलं की त्याने माझ्यासाठी लिहिलेली पत्रे मनीषाला सापडली आहेत असा दावा मनीषाने केला आहे.”

ऐश्वर्या पुढे म्हणाली, “राजीवशी फोनवर बोलल्यानंतर देखील माझा त्याच्यावर विश्वास नव्हता! त्याने जे सांगितले त्या गोष्टीचा मला खूप मोठा धक्का बसला होता. मनीषाने सांगितलेली गोष्ट जर खरी असती तर जुलै १९९४ मध्ये जेव्हा या सगळ्या अफवा सुरु होत्या, तेव्हा ही गोष्ट बाहेर का आली नाही. जर दोन महिन्यांमध्ये राजीवबरोबर विभक्त होण्याचे कारण ते पत्र होते, मग त्या पत्राला नऊ महिने लपवण्याची काय गरज?”

मनीषाच्या या गोष्टीचा तिच्यावर कसा परिणाम झाला याबद्दल ऐश्वर्याने पुढे सांगितले आहे. ऐश्वर्या म्हणाली, “मनीषाच्या या सगळ्या गोष्टींचा परिणाम माझ्यावर झाला आणि मी खूप दिवस रडली. कोणत्या विशेष नावाने किंवा कारणामुळे मला लोकांनी ओळखावे अशी माझी कधीच इच्छा नव्हती.”

ऐश्वर्या पुढे म्हणाली, “तुम्हाला यावर विश्वास होणार नाही. पण मला मनीषा बद्दल कटूता किंवा नाराजी नाही. खरं तर, मला वाटतं की तिच्या आयुष्यात लवकरच चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजे, म्हणजे तिच्या आयुष्यात स्थिरता येईल.”