‘ऐ मामू’ म्हणत आपल्या अभिनय शैलीने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारा अभिनेता संजय दत्त आई नर्गिस यांच्याशी भावनिकदृष्ट्या जवळ होता. आई आणि मुलाच्या नात्यामधील एक भन्नाट किस्सा समोर आला आहे. संजय दत्त हा समलैंगिक असल्याचे नर्गिस यांना वाटत होते.

यासीर उस्मान यांनी संजय दत्तवर लिहिलेल्या ‘संजय दत्त : द क्रेझी अनटोल्ड स्टोरी ऑफ बॉलिवूड बॅड बॉय’ या पुस्तकात संजयची बहीण नम्रता यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. संजय दत्तला प्रिया आणि नम्रता अशा दोन बहिणी आहेत. पहिले अपत्य असल्याने संजय दत्त आई नर्गिस यांच्या जवळचा होता. संजयदेखील आईवर जिवापाड प्रेम करायचा. लहानपणी आई नर्गिस संजय दत्तची प्रत्येक मागणी पूर्ण करायची. कधी कधी आई संजयवर चिडायची. त्याला ओरडायची. इतकच नव्हे तर आईने एक दिवस त्याच्या दिशेने चप्पल देखील भिरकावली होती. पण तिचे संजयवर तितकेच प्रेमही होते, अशी आठवण नम्रता यांनी सांगितली.

प्रिया दत्त यांनी पुस्तकात एक किस्सा सांगितला आहे. ‘माझी आई मैत्रिणीशी फोनवर बोलत होती. संजय दिवसभर मित्रासोबत खोलीत काय करतो माहित नाही?. खोलीचा दरवाजा बंद का असतो? तो समलैंगिक नसावा अशी आशा आहे’, असे नर्गिस यांनी मैत्रिणीला सांगितले. प्रिया यांनी आईचे हे फोनवरील संभाषण ऐकले होते.

आई नर्गिस यांच्या मृत्यूसमयी संजय व्यसनाधीन झाला होता. आईच्या निधनानंतर तो आणखी खचला होता. नर्गिस यांचेही मुलावर प्रेम होते. मुलगा व्यसनाधीन असल्याचे त्यांनी आधी स्वीकारले नव्हते. कधी कधी त्यांनी संजय दत्तला पाठिशीही घातले होते. दत्त कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी संजूबाबाच्या व्यसनाधीनतेबाबत नर्गिस यांच्याकडे तक्रार करण्याचा प्रयत्नदेखील केला होता. मात्र, माझा मुलगा कधीही मद्याला स्पर्श करणार नाही आणि तो अमलीपदार्थ देखील घेणार नाही, असे नर्गिस सांगायच्या.

नर्गिस यांच्या निधनाच्या दोन वर्षांनंतर संजय दत्तने आईचा शेवटचा संदेश ऐकला होता. नर्गिस यांनी मृत्यूपूर्वी न्यू यॉर्कमधील रुग्णालयात उपचार घेत असताना मुलासाठी संदेश रेकॉर्ड करुन ठेवला होता. ‘संजय तू स्वत:शी प्रामाणिक राहा. दिखाव्याच्या मागे धावू नकोस. मोठ्यांचा आदर कर, सर्वांशी नम्रपणे वाग. तुला याचा फायदा होईल’, असे नर्गिस यांनी म्हटले होते. आईचा हा संदेश ऐकून संजय दत्त ढसाढसा रडला होता.

आईचा हा मेसेज ऐकून संजय दत्त किमान चार ते पाच तास रडत होता. या घटनेनंतर मी एक चांगला माणूस होण्याचा प्रयत्न सुरू केला, असं संजय दत्तने एका मुलाखतीत सांगितले होते.