बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘वीर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे झरीन खान. या पहिल्यावहिल्या चित्रपटाने झरीनला ओळख मिळवून दिली. त्यानंतर तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. पण तिची तुलना बऱ्याच वेळा अभिनेत्री कतरिना कैफशी करण्यात आली. याबाबत तिने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.
नुकताच झरीनने ‘नवभारत टाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला तिची तुलान बऱ्याच वेळा अभिनेत्री कतरिना कैफशी करण्यात येते असे म्हटले गेले. त्यावर तिने उत्तर देत कतरिनामुळे माझ्या करिअरवर परिणाम झाला असा अरोप केला आहे. ‘प्रत्येक व्यक्ती हा इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण करण्यासाठी येतो. मी बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी ओळख निर्माण करण्यासाठी गेली ११ वर्षे प्रचंड मेहनत घेतली. पण आजपर्यंत लोकं मला मी कतरिनासारखी दिसते असं म्हणतात. मी तिच्यासारखी दिसत असल्यामुळे कोणताही चित्रपट निर्माता माझ्यासोबत काम करण्यास तयार नाही. कतरिनामुळे माझ्या करिअरवर परिणाम झाला’ असे झरीन म्हणाली.
View this post on Instagram
पुढे ती म्हणाली, ‘बऱ्याच वेळा लोकं मला मी अभिनेत्री पूजा भट्ट सारखी दिसते असे म्हणतात. तर कधी मी प्रीती झिंटा आणि सनी लिओनीसारखी दिसत असल्याचे म्हटले जाते. पण लोकं मला मी अभिनेत्री झरीन खान आहे असं का म्हणत नाहीत?’
झरीन खान गेल्या ११ वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. तिने ‘हाऊसफूल २’, ‘हेट स्टोरी ३’, ‘अकसर २’, ‘रेडी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता लवकरच तिचा आणखी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘हम भी अकेले तुम भी अकेले’ असे आहे.