अभिनेता प्रणव मोहनलाल त्याच्या साधेपणामुळे चर्चेत असतो. प्रणव हा मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांचा मुलगा आहे. स्वतःही चित्रपट करत असला तरी तो प्रसिद्धीपासून दूर राहणं पसंत करतो. चित्रपट करत नसेल तर तो कॅमेऱ्यांसमोरही येत नाही. लहानपणीही प्रणव कधीच कोणत्या सुखसोयींची मागणी करत नव्हता, मर्यादित गोष्टींमध्ये तो आनंदी राहायचा, असं मोहनलाल यांनीच एकदा सांगितलं होतं.

“प्रणव शिकत असताना कमीत कमी सुविधा असलेल्या हॉस्टेलमध्ये राहत होता. त्याचं आयुष्य खूप साधं होतं. मर्यादित सोई-सुविधांमध्ये तो वाढला. मी त्याला बऱ्याच लक्झरी काही सुखसोयी परवू शकलो असतो, पण त्याने कधीही मागणी केली नाही. त्याने माझ्या एका चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं, तेव्हाही त्याने फार सुखसोयींची मागणी केली नव्हती,” असं मोहनलाल यांनी २०१७ च्या एका कार्यक्रमात सांगितलं होतं.

आपली स्वप्ने किंवा अपेक्षा कधीच मुलावर लादल्या नाहीत, असं मोहनलाल यांनी म्हटलं होतं. “खरं तर, त्याने काय करू नये याबद्दल मला स्पष्टता होती. आपली मुलं एका धोकादायक जगात राहतात. तो सहज चुकीच्या मार्गावर जाऊ शकला असता आणि त्याबद्दल कुणालाही कळालं नसतं. पण त्याने तसं काहीच केलं नाही याचा मला खूप आनंद आहे. माझ्या मते, आई-वडिलांनी त्यांच्या मुलांनी काय बनू नये यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. मी फक्त पदवीचं शिक्षण घ्यावं, अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. पण मला अप्पूला (प्रणव) तेही सांगावं लागलं नाही,” असं मोहनलाल म्हणाले होते.

प्रणवने दिग्दर्शक जीतू जोसेफ यांच्या ‘आधी’ चित्रपटातून २०१८ मध्ये मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केलं होतं. पण त्याचा पहिला चित्रपट ओन्नमन (२००२) हा होता. तेव्हा प्रणव १२ वर्षांचा होता. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी २००२ मध्ये रेडिफला दिलेल्या मुलाखतीत मोहनलाल मुलाच्या पदार्पणाबद्दल म्हणालेले, “तो खऱ्या आयुष्यात जे करतो तेच त्यानं केलंय. माझ्याप्रमाणेच, त्यालाही अभिनय म्हणजे काय हे माहित नाही.”

मोहनलालचा मुलगा आहे म्हणून भारी का वाटावं?

“मी असा बाबा नाही ज्याची इच्छा आहे की आपल्या मुलाने चित्रपटांमध्ये काम करावं आणि नाव कमवावं. माझ्या अशा कोणत्याही महत्त्वाकांक्षा नाहीत. प्रणवने अभिनय केला कारण त्याला करायचा होता. एवढंच. कोणीतरी त्याला विचारलेलं, ‘तू मोहनलालचा मुलगा आहे, तर तुला कसं वाटतं?’ तो म्हणाला, ‘ते माझे वडील आहे. मी मोहनलालचा मुलगा आहे म्हणून मला भारी का वाटावं?’ मला त्याचा हा अॅटिट्यूड आवडला. मला फक्त अशी आशा आहे की तो आयुष्यभर असाच राहील,” असं मोहनलाल यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, प्रणव मोहनलाल सध्या त्याचा पुढचा चित्रपट Diés Iraé च्या तयारीत व्यग्र आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राहुल सदाशिवन करत आहे.