बॉक्स ऑफिसवर कोणता चित्रपट चालेल आणि कोणता नाही, हे प्रेक्षक ठरवतात. एखादा चित्रपट हिट होईल की नाही त्याबद्दल अंदाज बांधणं अलीकडच्या काळात कठीण झालं आहे. सुपरस्टार्सचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरतात. तर नवख्या कलाकारांचे चित्रपट कोट्यवधींचा गल्ला जमवतात.
चित्रपटसृष्टीत टिकून राहण्यासाठी, कलाकारांना हिट चित्रपट द्यावे लागतात. त्याचबरोबर चित्रपटांचं अपयश पचवण्याची कलाही आत्मसात करावी लागते. मल्याळम अभिनेता टोव्हिनो थॉमसच्या बाबतीतही असंच घडलं. मल्याळम इंडस्ट्रीत अनेक सुपरहिट सिनेमांचा भाग असलेला टोव्हिनो जेव्हा मुख्य अभिनेता म्हणून एक चित्रपट घेऊन आला, तेव्हा तो चित्रपट फ्लॉप ठरला. हा सिनेमा फ्लॉप झाल्याने त्याच्या करिअरला मोठा फटका बसला.
टोव्हिनो थॉमस हा त्या मोजक्याच कलाकारांपैकी एक आहे, ज्याने मल्याळम सिनेसृष्टीला सर्वाधिक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. रंजक गोष्ट अशी की आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणाऱ्या पाच मल्याळम चित्रपटांपैकी तीन – लोका चॅप्टर १: चंद्रा, एल२: एम्पुरान आणि २०१८: एव्हरीवन इज अ हिरो – मध्ये त्याने काम केलंय. लोकामध्ये त्याने कॅमिओ केला. तर मोहनलाल यांच्या एम्पुरान मध्ये त्याने सहाय्यक भूमिका केली होती.
टोव्हिनोचा आतापर्यंतचा सर्वात मोठा सोलो हिट चित्रपट म्हणजे जितिन लाल दिग्दर्शित अजयंते रांदम मोशनम (एआरएम, २०२४) होय. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्याने जगभरात १०० कोटींहून अधिक कमाई केली. या सिनेमामुळे टोव्हिनोचं मल्याळम इंडस्ट्रीतील स्थान भक्कम झालं. एआरएमच्या रिलीजनंतर चार महिन्यांपेक्षा कमी कालावधीत, टोव्हिनो आणखी एक चित्रपट ‘आयडेंटिटी’ घेऊन परतला. या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात अखिल पॉल आणि अनस खान होते. तसेच तब्बल सात वर्षांनी त्रिशा कृष्णन मल्याळम सिनेमात झळकली.
फ्लॉप झाला आयडेंटिटी
‘आयडेंटिटी’ला बॉक्स ऑफिसवर ‘मार्को’ने टक्कर दिली. दोन आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झालेला उन्नी मुकुंदनचा ‘मार्को’ हा एकमेव चित्रपट थिएटर्समध्ये होता. पण तरीही टोव्हिनो थॉमस आणि त्रिशाच्या चित्रपटाला फायदा झाला नाही. तांत्रिक बाबीत सिनेमाचं कौतुक झालं असलं तरी तो प्रेक्षकांना आकर्षित करण्यात अयशस्वी ठरला. नंतर रेखाचित्रम् हा सिनेमा रिलीज झाला आणि ‘आयडेंटिटी’ला प्रेक्षकच मिळाले नाहीत.
फेब्रुवारीमध्ये, केरळच्या चित्रपट निर्मात्यांच्या संघटनेने मल्याळम चित्रपटांचे बजेट आणि राज्यातील चित्रपटगृहांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वाटा याबद्दल माहिती दिली होती. तेव्हा आयडेंटिटीचे बजेट ३० कोटी रुपये होते, पण सिनेमाने केरळमध्ये फक्त ३.५ कोटी रुपये कमावले, असं सांगितलं. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या वृत्तानुसार, टोव्हिनो आणि त्रिशा यांच्या चित्रपटाने जगभरात फक्त १६.५१ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते.