१ मे २०१६ या दिवशी संयुक्त महाराष्ट्र आपली दैदीप्यमान ४६ वर्ष पूर्ण करत असल्याच्या शुभमुहूर्तावर मराठी सिनेमा इंडस्ट्रीत ‘१०६, हुतात्मा चौक- संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ या ऐतिहासिक सिनेमाची घोषणा करण्यात आली. प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल इनामदार या सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून लवकरच त्याच्या शूटिंगचा प्रारंभ होईल.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका शानदार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी ‘१०६, हुतात्मा चौक’ या महत्त्वाकांक्षी मराठी सिनेमाची घोषणा केली. संयुक्त महाराष्ट्र लढा आणि त्यासाठी आपल्या जीवाचे बलिदान देणाऱ्या १०६ हुताम्यांवर आधारित हा सिनेमा मराठी सिनेमासृष्टीत यशाचे शिखर गाठणारा असेल. मोठे बजेट लाभलेल्या या ऐतिहासिक सिनेमाची कथा- पटकथा, संगीत, कपडेपट आणि दिग्दर्शनावर कसोशीने मेहनत घेतली जाणार आहे. या सिनेमात भव्यदिव्य स्टारकास्ट घेतली जाणार असून कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यातच आहेत. सिनेमाचा विषय आणि एकंदर आवाका लक्षात घेता मराठी इंडस्ट्रीत आतापासूनच या सिनेमाची चर्चा आहे.
१९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषेच्या निकषांवर राज्यांच्या सीमारेषा आणखण्यात आल्या मात्र, महाराष्ट्र आणि गुजरात या फक्त दोन राज्यांना एकाच द्वैभाषिक राज्याचा दर्जा देण्यात आला. साहजिकच हे मराठी माणसाला सहन होणे शक्य नव्हते आणि बॉम्बे म्हणजेच आताचं मुंबई या समस्येच्या कळसाध्यायी होते. त्यातूनच संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा सुरू झाला. १९६० मध्ये फ्लोरा फाउंटन पोलिसांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी निदर्शने करणाऱ्या निदर्शकांवर गोळीबार केला आणि त्यात जागोजागी १०६ जण मृत्यूमुखी पडले. या १०६ हुताम्यांच्या स्मरणार्थ फ्लोरा फाउंटन येथे हुतात्मा चौक बांधण्यात आला..
hutatma chauk
विशाल इनामदार यांचा ‘१०६, हुतात्मा चौक’ हा सिनेमा एका काल्पनिक व्यक्तीरेखेच्या नजरेतून पाहायला मिळतो, जो उत्तर कर्नाटकात असलेल्या; पण मराठी भाषिकांचं गाव असलेल्या निपाणीचा असतो. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या काळाचा तो साक्षीदार असतो. केशवराव जेधे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली संयुक्त महाराष्ट्र समिती आणि प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, सेनापती बापट, एस.एम. जोशी, एन. जी. गोरे, एस. ए. डांगे, शाहीर अमर शेख यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वांनी प्रेरित केलेला काळ त्याने पाहिलेला असतो. सिनेमात एका स्थलांतरिताची काल्पनिक कहाणी आणि चळवळीदरम्यान घडलेले प्रत्यक्ष राजकीय आणि सामाजिक प्रसंग पाहायला मिळतात.
सिनेमाची कथा कौस्तुभ सावरकर यांनी लिहिली असून श्री स्वामी समर्थ पिक्चर्सद्वारे त्याची निर्मिती करण्यात आली आहे. हा चित्रपट मे २०१७ मध्ये प्रदर्शित होणार आहे.