भारतीय चित्रपटसृष्टीला आज १०८ वर्षे पूर्ण झाली आहेत. दादासाहेब फाळके यांचा ‘राजा हरिश्चंद्र’ हा चित्रपट ३ मे १९१३ रोजी मुंबईत प्रदर्शित झाला तेव्हापासून भारतीय चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवली गेली असे मानले जाते. आज ३ मे रोजी १०८ वर्षे पूर्ण होत आहेत. हा भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला मुकपट होता. लंडनहून आल्यानंतर दादासाहेब फाळके यांनी ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाची निर्मिती केली. त्याआधी भारतीय लोकांचा चित्रपटांशी काही संबंध नव्हता. आज आपण भारताच्या पहिल्या फीचर फिल्मबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत…
दादासाहेब फाळके यांनी ‘राजा हरिश्चंद्र’ या पहिला मूकपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटात कहाणी ही हावभाव करत सांगण्यात आली. त्याचवेळी स्वातंत्र्यासाठी आपल्या देशात सर्वतोपरी प्रयत्न सुरु होते. इंग्रजांशी लढण्यासाठी सर्वसामान्य जनेताला प्रेरणा मिळावी म्हणून या चित्रपटाच्या कथेचा पायाही यावरच तयार करण्यात आला होता. हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येक भारतीयाला स्वातंत्र्याचे स्वप्न दिसू लागले होते.
१९१३मध्ये प्रदर्शित झालेल्या दादासाहेब फाळके यांच्या ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाचा बजेट हा १५ हजार रुपयांचा होता. या चित्रपटात एकही स्त्री नव्हती. चित्रपटातील अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी एका स्त्रीच्या शोधात दादासाहेब रेड लाईट क्षेत्रात देखील गेले होते. मात्र त्यांना अभिनेत्री भेटली नाही. तर चित्रपटात तारामती नावाच्या राणीची भूमिका ही अण्णा साळुंके यांनी साकारली होती. तर चित्रपटात हरिश्चंद्राची भूमिका ही डीडी डाबके यांनी साकारली होती.
३ मे १९१३ हा दिवस मुंबईसाठी महत्त्वाचा दिवस मानला जातो. याच दिवशी भर उन्हात लोकांनी गिरगावातील कोरोनेशन थिएटरमध्ये राजा हरिश्चंद्र हा भारताचा पहिला मूकपट पाहिला. हा चित्रपट पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. हा चित्रपट जवळपास ५० मिनिटांचा होता. या चित्रपटाचे पोस्टर्स हे मराठी आणि इंग्रजी भाषेत तयार करण्यात आले होते.