बॉलीवूडची प्रसिद्ध दिग्दर्शिका व कोरिओग्राफर फराह खान अनेक मुलाखतींमध्ये तिचा मित्र शाहरुख खानचे कौतुक करताना ऐकायला मिळते. फराह खान आणि शाहरुख खान खूप चांगले मित्र आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का ही मैत्री कधी आणि कशी सुरू झाली?
आज आम्ही तुम्हाला शाहरुख खानच्या त्या चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या सेटवर शाहरुख खान आणि फराह खानची मैत्री सुरू झाली होती. या चित्रपटासाठी शाहरुख खानला २५ हजार रुपये मिळाले होते.
शाहरुख आणि फराह यांची पहिली भेट कधी झाली?
या चित्रपटात शाहरुख खानचे पात्र खूपच कमकुवत दाखविण्यात आले आहे. हा चित्रपट १९९४ मध्ये प्रदर्शित झाला होता. तुम्हाला त्या चित्रपटाचे नाव माहीत आहे का? जर नसेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो. या चित्रपटाचे नाव ‘कभी हां कभी ना’ आहे. तो हा चित्रपट आहे ज्याच्या सेटवर शाहरुख खान आणि फराह खान पहिल्यांदा भेटले होते आणि येथूनच त्यांची मैत्री सुरू झाली.
फराहला शाहरुखबद्दल काय वाटले होते?
फराह खानने ‘रेडिओ नशा’ला दिलेल्या जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, १९९१ मध्ये जेव्हा ‘कभी हां कभी ना’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते तेव्हा ती पहिल्यांदा शाहरुखला भेटली. फराह खानने सांगितले की, शाहरुख खानला भेटण्यापूर्वी ती एका मासिकात शाहरुख खानबद्दल वाचत होती. त्यावेळी तिला शाहरुख खानच्या वागण्याची पद्धत आवडली नव्हती.
फराह म्हणाली, “मला आठवतंय की रस्त्यावर शूटिंग चालू होतं आणि शाहरुख खान सुनील (चित्रपटातील शाहरुखच्या पात्राचे नाव)चे जॅकेट व टोपी घालून भिंतीवर टेकून ट्रंपेटचा सराव करीत होता आणि मग कुंदन शाह (चित्रपटाचे दिग्दर्शक) यांनी आमची ओळख करून दिली.” फराह म्हणाली की, कधी कधी असे होते की, तुम्ही एखाद्याला भेटता आणि तुम्हाला अचानक असे वाटते की, तो माझ्या शाळेच्या आणि कॉलेजच्या मित्रासारखा आहे. फराह पुढे म्हणाली की, तिच्या आणि शाहरुखच्या अनेक सवयी सारख्याच होत्या; पुस्तकांच्या निवडीपासून ते दोघांच्या विनोदबुद्धीपर्यंत.
फराह खान म्हणाली की, त्या शूटिंगदरम्यान शाहरुख खानने तिची खूप काळजी घेतली होती. फराह सांगते की, त्या चित्रपटाचे बजेट खूप कमी होते. शाहरुख खानला फक्त २५ हजार रुपये मिळाले. त्याच वेळी फराह खानला शाहरुखपेक्षा जास्त पैसे मिळाले होते. फराह खानला एका गाण्यासाठी पाच हजार रुपये मिळाले होते आणि त्या चित्रपटात सहा गाणी होती.