बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते राज कपूर आणि दिलीप कुमार यांचं पाकिस्तानस्थित असलेली वडिलोपार्जित हवेली विकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ‘कपूर हवेली’ नावाने ओळखली जाणारी ही हवेली खैबर-पख्तूनख्वाच्या प्रांत सरकारने खरेदी करण्याची ठरवली आहे. यासाठी खैबर-पख्तूनख्वाच्या प्रांत सरकारच्या पुरातत्व विभागाने तब्बल २.३० कोटी रूपये इतकी रक्कम पेशावरच्या उपायुक्तांकडे दिली आहे. पाकिस्तानमध्ये असलेल्या या हवेलीचं संग्रहालयात रूपांतर करण्यात येणार आहे.
दिलीप कुमार आणि राज कपूर यांची वडिलोपार्जित हवेली अत्यंत मोठी आहे. त्या हवेलीला आता राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करण्यात आलं आहे. दोन्ही घरांच्या सध्याच्या मालकांना खरेदीसाठी अंतिम नोटीस बजावल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या हवेलीला खरेदी केल्यानंतर खैबर पख्तूनख्वाचं पुरातत्व विभाग हवेलीला संग्रहालयात रूपांतरित करणार आहे. खैबर पख्तूनख्वाचे पुरातत्व विभागाचे संचालक अब्दुल समद यांनी सांगितलं की, या हवेलीची सध्याची अवस्था खूपच वाईट झाली आहे. हवेलीला खरेदी केल्यानंतर ज्या रचनेत आधी ही हवेली होती त्याच रचनेत नव्याने डागडुजीचं काम सुरू करण्यात येईल. फिल्म इंडस्ट्रीत दिग्गज अभिनेते दिलीप कुमार आणि राज कपूर यांनी दिलेल्या योगदानाबद्दल लोकांना माहिती मिळावी यासाठी खैबर पख्तूनख्वाचं सरकार या दोन्ही हवेलीचं रूपांतर ऐतिहासिक इमारतीत करुन त्याचं जतन आणि संवर्धन करणार आहे. खैबर पख्तूनख्वा सरकारने 1701.5625 स्क्वेअर फुटाचं राज कपूर यांचं आणि 1089 स्क्वेअर फुटाचं दिलीप कुमार यांच्या घरासाठी अनुक्रमे १.५० कोटी आणि ८० लाख इतकी किंमत ठरवली आहे.
बजावली अंतिम नोटीस
पेशावरचे उपायुक्त खालिद महमूद यांनी दोन्ही ऐतिहासिक इमारतींसंदर्भात ७ मे रोजी अंतिम नोटीस बजावली होती. त्यानंतर खैबर पख्तूनख्वाच्या पुरातत्व विभागाकडून या हवेलीसाठी गुंतवणूक निश्चित करण्यासाठी पेशावरच्या उपायुक्तांना एक अधिकृत पत्र पाठवण्यात आलं.
ठरलेल्या किंमतीवरून नाराज आहेत हवेलीचे दोन्ही मालिक
याआधी सरकारने राज कपूर आणि दिलीप कुमार यांच्या घरांसाठी अनुक्रमे १.५० कोटी आणि ८० लाख इतक्या रकमेत खरेदी करून त्याला संग्रहायलात रूपांतरित करण्याचा प्रस्ताव दिला होता. पण संपत्तीचे सध्याचे मालक अली कादिर यांनी २० कोटींची मागणी केली होती. तर दिलीप कुमार यांच्या हवेलीचे मालक गुल रहमान मोहम्मद यांनी हवेलीला मार्केट रेट नुसार जवळपास ३.५० कोटी इतकी रक्कम ठरवण्यासाठी सांगितलं होतं.